दहा दिवसांत स्वाइन फ्लूचे ५० रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:05 AM2017-09-02T02:05:35+5:302017-09-02T02:05:38+5:30
ठाणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात स्वाइन फ्लूच्या रुग्णांत ५० ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात अद्यापही १९२ स्वाइन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात स्वाइन फ्लूच्या रुग्णांत ५० ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात अद्यापही १९२ स्वाइन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २०१५ मध्ये स्वाइन फ्लूने ४८ जणांचा बळी घेतला होता. यंदा आतापर्यंत स्वाइनने ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
मोठ्या प्रमाणात वातावरणात झालेल्या बदलाने रुग्णांची संख्या वाढते आहे. मागील दहा दिवसात जिल्ह्यात स्वाइनबाधित रुग्णांची संख्या ४८ ने वाढल्याने सध्या १९२ जणांंवर उपचार सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११४ रुग्ण ठामपा कार्यक्षेत्रात आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी-६३, नवी मुंबई-१० आणि मीरा-भार्इंदर येथे ५ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ४७ जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला असून त्यातील ३० ठामपा हद्दीत, त्यापाठोपाठ केडीएमसी येथे-६ आणि नवी मुंबई तसेच मीरा-भार्इंदर येथे प्रत्येकी ४ जण दगावले आहेत.
२०१५ या वर्षात जिल्ह्यात ८२२ जणांना लागण झाली होती, तर ४८ जणांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये स्वाइनचा एकच रुग्ण होता. २०१७ मध्ये आतापर्यंत ९४२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.