५० मुख्याध्यापकांची ठामपा शाळांत वानवा
By admin | Published: April 9, 2017 02:48 AM2017-04-09T02:48:54+5:302017-04-09T02:48:54+5:30
एकीकडे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात महापालिका शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे.
ठाणे : एकीकडे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात महापालिका शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. परंतु, असे असले तरी आधी या शाळांमध्ये रिक्त असलेले मुख्याध्यापकपद तरी आधी भरा, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. महापालिका शाळेत मागील पाच वर्षांपासून सुमारे ५० मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे, ई-लर्निंग आदींसह विविध योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, असे असले तरी पाच वर्षांपासून महापालिका मुख्याध्यापकच नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य काहीसे अधांतरी आल्याचे दिसत आहे. यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जुन्या शिक्षकांच्या हाती सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये त्यांना मुख्याध्यापकपदाची सूत्रे देण्यात आली. परंतु, ती केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
त्यांच्यावर कारवाई कधी?
महापालिका शाळांमध्ये आजघडीला सुमारे ३४ हजारांच्या आसपास विद्यार्थी आहेत. १२०० च्या आसपास शिक्षकवृंद त्यांना ज्ञान देण्याचे काम करत आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे.
आपल्यावर लक्ष ठेवण्यास कोणी नसल्याने काही ठिकाणी शिक्षकदेखील उशिराने शाळेत हजेरी लावत आहेत.
महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या सुमारे २०, उर्दू २, हिंदी ४ आणि इंग्रजी माध्यमाच्या ६ शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वानवा आहे.