मुंब्य्रातून ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:44 AM2017-08-19T03:44:38+5:302017-08-19T03:44:40+5:30
नालासोपारा येथील एका रहिवाशाजवळून सुमारे ५० लाख रुपयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त केल्या.
ठाणे/मुंब्रा : नालासोपारा येथील एका रहिवाशाजवळून सुमारे ५० लाख रुपयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त केल्या.
चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन एक आरोपी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी रेल्वे स्थानकासमोरील मुंब्रा हॉटेलजवळ सापळा रचला. हॉटेलजवळील ओव्हरब्रिजखाली काळ्या रंगाची बॅग पाठीवर घेतलेल्या एका व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बॅग तपासली असता, त्यामध्ये पाचशे रुपयांच्या २००२, तर हजार रुपयांच्या ३९३८ नोटा असे एकूण ४९ लाख ३९ हजार रुपये आढळले.
आरोपीचे नाव जफर अहमद मोहम्मद शोएब शेख असून तो नालासोपारा (पूर्व) येथील अचोले रोडवरील साईश्रद्धा सोसायटीचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल फोन जप्त केला आहे. त्याआधारेही तपास सुरू आहे. नोटाबंदीनंतर या जुन्या नोटा नेमकया कोणत्या व्यक्ती खरेदी करणार होत्या, हा व्यवहार तो कुणाशी करणार होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या अशा नोटा बाळगणे हा गुन्हा आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.