'त्या' मजुराच्या कुटुंबाला ५० लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:56 AM2024-06-24T06:56:54+5:302024-06-24T06:58:51+5:30
जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीजवळ झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह जमिनीत गाडलेला मजूर राकेश यादव याच्या कुटुंबीयाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच, राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवस प्रयत्न करूनही त्याचा अद्यापही शोध लागला नाही.
अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण केले. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत होत्या. राकेश याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी यादव कुटुंबीयाला मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे एमएमआरडीएला यांनी दिले. त्यानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये, विम्याचे १५ लाख असा एकूण ५० लाख रुपयांचा धनादेश राकेश यादव याच्या कुटुंबीयाला देण्यात आला आहे.