गहाळ झालेले २१ लाख ५० हजारांचे ५० मोबाईल सापडले
By अजित मांडके | Published: March 30, 2024 06:56 PM2024-03-30T18:56:36+5:302024-03-30T18:56:44+5:30
ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला.
ठाणे : रिक्षात विसरलेले, रस्त्यात पडलेले किंवा चोरीला गेलेले तब्बल २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाईल शोधण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. त्यानुसार शनिवारी यातील काही जणांचे मोबाइल प्राथनिधीक स्वरुपात हस्तांतरीत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयात मागील काही महिन्यात नागरीकांचे मोबाइल फोन हरविण्याचे प्रमाण वाढल्याने त्या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरीष्ठांनी हरविलेली मालमत्ता शोधून ती संबधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरीकांचे हरविलेल्या मोबाइल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करुन २१ लाख ५० हजार रुपये किमंतीचे ५० मोबाइल शोधून काढले आहेत. त्यानंतर शनिवारी त्याचे प्राथनिधीक स्वरुपात काही मालकांना ते मोबाइल परत देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, परिसरातील नागरीकांना यावेळी आवाहन करण्यात आले असून ज्यांचे मोबाइल गहाळ झाले असेतील त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा वेबसाईटवर अपलोड करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.