बडोदरा जेएनपीटी महामार्गातील बदलापूर - पनवेल दरम्यानच्या बोगद्याचे काम 50 टक्के पूर्ण
By पंकज पाटील | Published: February 13, 2024 06:58 PM2024-02-13T18:58:01+5:302024-02-13T18:58:48+5:30
महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल.
बदलापूर : बडोदा जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे.
बदलापूर ते पनवेल दरम्यान जो ४.१६किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्या बोगद्याचे काम निम्मे पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रूंद असा महामार्ग असेल. हा रस्ता बदलापूर शहराजवळून जात आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे.
तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून २०२५ पर्यंत वाट पहावी लागणार आहेत. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी हा खुला होणार आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहे. सोबतच मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असणार आहेत. त्यामुळं अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान महामार्ग उपलब्ध होणार आहे.
बोगद्याचे सुरू असलेल्या कामाची पाहणी आज आमदार किसन कथोरे यांनी केली. बदलापूरहून पनवेलच्या दिशेने एक किलोमीटर आणि पनवेलहून बदलापूरच्या दिशेने एक किलोमीटर अशा दोन किलोमीटर पर्यंतच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूने सुरू करण्यात आलेल्या बोगद्याचे काम डोंगराच्या मध्यभागी जोडले जाणार आहे. कामाला गती मिळावी यासाठी पनवेल आणि बदलापूर अशा दोन्ही बाजूने काम सुरू झाल्याने या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे.
'' बडोदरा मुंबई महामार्गमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा असून त्याचे काम जलद गतीने सुरू आहे. बोगद्यासोबतच महामार्गाचे काम देखील बदलापूर शहरात प्रगतीपथावर असून ते काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे - सुहास चिटणीस, प्रकल्प प्रमुख.