‘बारवी’त ५० टक्केच पाणीसाठा
By admin | Published: August 6, 2015 02:56 AM2015-08-06T02:56:06+5:302015-08-06T02:56:06+5:30
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांसह महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो
बदलापूर : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांसह महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा कमी पडल्याने या धरणात अवघा ५० टक्केच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हे धरण ४ आॅगस्टला भरले होते. मात्र, यंदा पाण्याची पातळी ही निम्मीच राहिली आहे. महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास बारवी धरणावर अवलंबून असलेल्या उद्योगांना आणि महापालिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी ते उभारण्यात आले. मात्र, औद्योगिक शहरांची पाण्याची तहान भागविण्यासोबत या धरणातील पाणी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि महापालिकांनाही पुरविण्यात येत आहे.
बारवी धरणाच्या पाण्याची क्षमता ही १७२ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची उंची ही ६५.१५ मीटर आहे. या धरणाची उंची वाढविण्यात आलेली असली तरी अजून या धरणावर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धरण भरल्यावर पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार केला आहे. मात्र, बारवी धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही.
जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे धरण भरणे अपेक्षित आहे. २०१३ मध्ये २० जुलै रोजी धरण भरले होते. गेल्या वर्षी हे धरण ४ आॅगस्टला भरले होते. यंदा मात्र त्यात अवघा ५० टक्के पाणीसाठा असल्याने या ठिकाणी असलेला वीजनिर्मिती प्रकल्पही बंद ठेवला आहे. या धरणातील ८० टक्के पाणी नागरिकांसाठी तर उर्वरित पाणी औद्योगिक क्षेत्र आणि शेतीसाठी पुरविण्यात येते.