केडीएमसी रुग्णालयांत मानद वैद्यकीय अधिकारी, ५० टक्के पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:48 AM2019-07-17T00:48:17+5:302019-07-17T00:48:22+5:30
केडीएमसी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५ मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत.
कल्याण : केडीएमसी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११५ मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तोपर्यंत मानद वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी महापालिका ई-निविदा मागविणार आहे. त्यासाठी २० जुलैच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
२०१४ मध्ये वैद्यकीय पदांना सरकारने मंजुरी दिली. तेव्हापासून आजपर्यंत ही पदे भरण्याची प्रक्रिया यशस्वी झालेली नाही. सरकारच्या महापरीक्षा पोर्टलद्वारे ही पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय पदे रिक्त असल्याने रुग्णालयातून योग्य प्रकारे आरोग्यसेवा दिली जात नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. वैद्यकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. त्याला डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरतीप्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मानद तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी नेमले जावेत, अशी सूचना आयुक्त गोविंद बोडके यांना केली होती. बोडके यांनी यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव तयार करून महासभेपुढे ठेवला आहे.
अंबरनाथच्या छाया रुग्णालयात एका खाजगी रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी मानद पद्धतीने घेतली आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील खाजगी रुग्णालय महापालिका रुग्णालयात आरोग्यसेवा देण्यास तयार आहे. अंबरनाथ पालिकेने ११ महिन्यांच्या करारावर वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयास ६२ हजार रुपये, बीएएमएस वैद्यकीय अधिकाºयास ३५ हजार, एएनएमसाठी आणि लॅब टेक्निशियनसाठी प्रत्येकी १५ हजार, फर्मासिस्टसाठी २० हजार मानधन दिले जात आहे. याचप्रमाणे केडीएमसी रुग्णालयात स्टाफ पुरवला जाणार आहे.