पारस कन्स्ट्रक्शन्सला ५० हजारांचा दंड
By admin | Published: May 26, 2017 12:14 AM2017-05-26T00:14:16+5:302017-05-26T00:14:16+5:30
इमारतीचे बांधकाम करून खोल्या विकल्यावर त्यातील सदस्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन न करणाऱ्या आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करणाऱ्या पारस
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इमारतीचे बांधकाम करून खोल्या विकल्यावर त्यातील सदस्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन न करणाऱ्या आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करणाऱ्या पारस कन्स्ट्रक्शन्सला फटकारुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.
मीरारोड येथील मेघालय को-आॅप हौसिंग सोसायटीचे बांधकाम पारस कन्स्ट्रक्शन्सने करून त्यातील खोल्या विकल्या. परंतु,इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच त्यांनी ग्राहकांना २००२-०३ मध्ये सदनिकांचा ताबा दिला. तसेच पैसे घेऊनही सदनिकाधारकांची गृहनिर्माण संस्था स्थापन न केल्याने सदनिकाधारकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून घेतली. संस्थेची स्थापना झाल्यावर भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून देण्याची मागणी अनेकदा तोंडी, पत्राद्वारे आणि वकिलामार्फत नोटीस पाठवूनही सदस्यांनी केली मात्र पारस कन्स्ट्रक्शन्सने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे मेघालय हौसिंग सोसायटीने त्यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. ती अॅड्रेस लेफ्ट या शेऱ्याने परत आल्याने जाहिररित्याही सुनावणीची नोटीस दिली. मात्र तरीही कन्स्ट्रक्शन्सने बाजू स्पष्ट केली नाही.
कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता कंपनीने बांधकाम केलेल्या इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, ओसीसाठी सदनिकाधारकांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही कन्स्ट्रक्शनने केले नाही. कंपनीने भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड संस्थेच्या नावे केले नाही. या मागण्यांसाठी मेघालय कोआॅप हौसिंग सोसायटीने वकिलामार्फत दिलेली नोटीसही परत आली. एकंदरीतच कंपनीने जबाबदारी पार न पाडता सदोष सेवा दिल्याचे मंचाने स्पष्ट केले.