जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:35+5:302021-07-21T04:26:35+5:30
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या ...
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या पाणी पातळीवरच जिल्ह्याच्या पाणी कपातीचे नियोजन करावे लागते. त्यामुळे बारवी धरण भरणे हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची उंची चार मीटरने वाढवल्यानंतर ३४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होतो. २० जुलै रोजी धरणात १७० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
आजच्या घडीला धरणाच्या पाण्याची पातळी ६५ मीटरपर्यंत आली असून धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार होता. मात्र, गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात धरण भरून वाहू लागते. मात्र, त्यासाठी पावसाने दमदार हजेरी लावणे गरजेचे ठरते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाच टक्के अतिरिक्त पाणीसाठा असून गेल्या वर्षी २० जुलै रोजी १५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. गेल्या ४८ तासांत बारवी धरण परिसरात सरासरी १७० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
उल्हास नदीला नैसर्गिक प्रवाह जास्त असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
-------