...तर ५०० कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त
By admin | Published: January 11, 2017 04:59 AM2017-01-11T04:59:25+5:302017-01-11T04:59:25+5:30
अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या
ठाणे : अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत १९ कोटींचे अमलीपदार्थ हस्तगत केले असून, बुधवारी कंपनीतील आणखी ११५ टन अमलीपदार्थांसह रसायनाची तपासणी केली जाणार आहे. जर यात अनियमितता आढळल्यास ही सुमारे ५०० कोटींची मालमत्ता जप्त करून कंपनीही सील केली जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
अंबरनाथच्या या कंपनीतून १८ कोटी ८५ लाखांचा ७५४ किलो अल्प्राझोलम हा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे. त्याआधी ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या दोघांकडून १५ लाखांचा ६ किलोचा ऐवज ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने कंपनीतील रसायन आणि अमलीपदार्थ तपासणीची व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. कंपनीतील गोदामे सील केली असून, मालाच्या वैधतेची तपासणी केली जात असल्याचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)