कल्याणमध्ये सापडली ५०० बनावट निवडणूक ओळखपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:58+5:302021-06-04T04:30:58+5:30
कल्याण : पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील माधव-संसार या उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखी ४५० ...
कल्याण : पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील माधव-संसार या उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखी ४५० ते ५०० बनावट कोरी निवडणूक ओळखपत्र आढळून आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कामेश मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. परंतु, या निवडणुकीच्या तोंडावर कोरी मतदार ओळखपत्रे कशासाठी आणली होती. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता. यात कामेशसह अन्य कोणी आहे का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
कामेश यांनी २६ मे रोजी मुलगा कौस्तुभ याला निवडणूक ओळखपत्र बाहेर काढून ठेव. मी घ्यायला येतो. हे सांगितल्यावर मुलाने ती काढली. मात्र ती बनावट व कोरी ओळखपत्र होती. हे पाहताच त्यांची पत्नी कृतिका हैराण झाली. तिने याची माहिती स्थानिकांना दिली. त्यांच्याकडून तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आकडे यांनी निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना सांगितल्यावर थळकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे तपासणी केली असता तीन बॉक्समध्ये निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरी निवडणूक ओळखपत्र आढळली. घरामध्ये ओळखपत्र बनविण्याची मशीन आणि शिक्के आहेत का, याचाही शोध घेतला असता ते सापडले नाही. थळकर यांनी तिन्ही बॉक्स ताब्यात घेतले असून त्याचा अहवाल आकडे यांना सादर केला. याप्रकरणी थळकर यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------
पत्नीनेच फोडले पतीच्या गैरकृत्याचे बिंग
कृतिका आणि कामेश यांच्यात वाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कृतिका हिने कामेश विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. न्यायालयाने जामीन मंजूर करताना घरात जायचे नाही. तिला त्रास द्यायचा नाही, असे त्याला सांगितल्याने तो कृतिका सोबत राहत नाही. दरम्यान त्याच्या घरात बनावट कोरी निवडणूक ओळखपत्र आढळली असून नायब तहसीलदार थळकर यांच्या तक्रारीवरून कामेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याचा शोध घेतला असता तो सापडलेला नाही.
- अशोक पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकपाडा पोलीस ठाणे
-----------------