५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:24+5:302021-02-27T04:53:24+5:30
ठाणे : कोरोनामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाच्या नोकरीधंद्यावर सर्वांत मोठा परिणाम मागील वर्षभरात झाला आहे. ...
ठाणे : कोरोनामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाच्या नोकरीधंद्यावर सर्वांत मोठा परिणाम मागील वर्षभरात झाला आहे. अजूनही कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे. अशा अडचणीच्या काळात तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी केलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ताकर माफीची घोषणा आता अंमलात आणावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.
मागील निवडणुकीत सत्ताधारी सेनेने पालिका क्षेत्रातील ५०० फुटांपर्यंत असणाऱ्या मालमत्तांना करमाफी देण्याची घोषणा केली होती. निवडणूक होऊन चार वर्षे झाली तरी या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. सध्या कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना त्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. सामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले आहे. किमान याची जाणीव ठेवून पाच वर्षांपूर्वी ठाणेकरांना दिलेले मालमत्ता करमाफीचे आश्वासन या अडचणीच्या काळात पूर्ण करून सामान्य ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली आहे.