देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 07:19 AM2024-10-03T07:19:14+5:302024-10-03T07:19:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मसाज पार्लरच्या नावाखाली थायलंडमधील महिलांना देह विक्रयासाठी तयार करून त्यांच्याकडून हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मसाज पार्लरच्या नावाखाली थायलंडमधील महिलांना देह विक्रयासाठी तयार करून त्यांच्याकडून हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणारा उल्हासनगरच्या हॉटेलचा मॅनेजर कुलदीप ऊर्फ पंकज सिंग (३७, रा. उल्हासनगर) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून १५ मुलींची सुटका केली. एका महिलेसाठी पाच हजारांचा सौदा झाला होता.
पोलिस निरीक्षक नरेश पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, संजय राठोड यांनी उल्हासनगरमधील सितारा लाजिंग ॲन्ड बोर्डिंगमध्ये कारवाई केली.
कागदपत्रांची तपासणी
पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. यात लॉजमधून पाच लाख २७ हजारांची रोकड व सामग्री जप्त करण्यात आली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार याठिकाणी सुरू होता. पासपोर्ट आणि व्हिजाची तपासणी सुरू असून कागदपत्रांसाठी कोणाची मदत घेतली, याचीही चौकशी सुरू आहे.
दुभाषकामार्फत चाैकशी
थायलंडच्या या महिलांना हिंदी किंवा इंग्रजी या दाेन्ही भाषा अवगत नाहीत. त्यामुळे चाैकशी करताना पाेलिसांना मुंबईतील एका दुभाषकाची मदत घ्यावी लागणार आहे.