महिन्याभरात होणार ५ हजार बेवारस वाहनांचा लिलाव; ठाणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 04:28 PM2020-12-09T16:28:59+5:302020-12-09T16:29:07+5:30

बेवारस अवस्थेत आढळलेल्या १३८७ पैकी सर्वाधिक ९८१ वाहने ठाणे शहरांतील आहेत.

5,000 unattended vehicles to be auctioned within a month; Thane traffic police crackdown | महिन्याभरात होणार ५ हजार बेवारस वाहनांचा लिलाव; ठाणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

महिन्याभरात होणार ५ हजार बेवारस वाहनांचा लिलाव; ठाणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

Next

ठाणे : ठाण्यातील रस्त्यावर ठाण मांडलेल्या बेवारस वाहनांच्या विरोधात ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या  पोलिसांनी सुरू केलेली कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या पंधरवड्यात एक हजार ३६९ बेवारस वाहनांना नोटिस बजावल्यानंतर जवळपास ९४५ मालकांनी आपली वाहने हटवली आहेत. उर्वरित वाहनांच्या लिलावासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. या वाहनांसह शहरांतील मोकळे भूखंड व्यापलेल्या तब्बल पाच हजार बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. अशातच या रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात उभी दिसतात. वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच दरवर्षी पावसाळ्यात रोगराईला निमंत्रण देणारी ही वाहने हटविण्याची मोहिम ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सुरू केल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यामुळे ठाणे शहरांतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.    

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत १३८७ वाहने बेवारस स्थितीत आढळली आहेत. त्यापैकी १३६९ वाहनांवर नोटिस चिकटविण्यात आली होती. त्यानंतर ९४५ वाहन मालकांनी आपली वाहने रस्त्यावरून हटवली आहेत. वाहतूक शाखेने २३६ वाहने हटवली आहेत. उर्वरित ३८८ वाहनांच्या चेसी आणि रजिस्ट्रेशन क्रमांकाची माहिती संकलित करून ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे धाडण्यात आली आहेत. तिथून या वाहनांच्या मालकांचे पत्ते मिळाल्यानंतर त्यांना रितसर नोटीस धाडली जाईल.

सात दिवसांत मालक पुढे आले नाहीत, तर पुढील १५ दिवसांसाठी स्थानिक न्यायालयामार्फत जाहीर सूचना काढली जाईल. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल. नँशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) पोर्टलवर या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया नमूद केलेली आहे. त्याला अनुसरून वाहनांचा लिलाव होईल, असे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.याच पद्धतीने ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील विविध ठिकाणच्या डंपिंग यार्डांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांच्या मालकांचाही मागोवा काढण्याचे काम वाहतूक विभागाने सुरू केले आहे.

ठाण्यात लोढा, तसेच साकेत पोलिस मैदान, मुंब्रा, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या ठिकाणच्या डंपिंग ग्राउंडवर वाहतूक विभाग तसेच स्थानिक महापालिकांनी जप्त केलेली किमान पाच हजार वाहने आहेत. त्यांचाही निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महापालिकेने जप्त केलेली वाहने आणि वाहतूक विभागाने जप्त केलेली वाहने यांची वर्गवारी करून परिवहन विभागाच्या मदतीने या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे अत्यंत जिकिरीचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही बाळासाहेब पाटील यांनी दिली. मूळ मालकांचा शोध घेतला जाईल आणि मग उर्वरित वाहनांचा लिलाव केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहरांत सर्वाधिक वाहनांवर कारवाई

बेवारस अवस्थेत आढळलेल्या १३८७ पैकी सर्वाधिक ९८१ वाहने ठाणे शहरांतील आहेत. त्या शालोखाल ३०३ वाहने कल्याण-डोंबिवली शहरांतील असून उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे अनुक्रमे ४१ आणि ३७ वाहने आढळली आहेत. आरटीओकडे माहितीसाठी पाठवलेल्या ३८८ पैकी ५० वाहनांची माहिती वाहतूक शाखेला प्राप्त झाली आहे. त्यापैकी २९ वाहन मालकांच्या पत्त्यावर नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. तर, ४५ वाहनांच्या चेसी आणि रजिस्टेशन क्रमांकाची माहितीच मिळू शकलेली नाही.

Web Title: 5,000 unattended vehicles to be auctioned within a month; Thane traffic police crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.