चार शहरांत 5052 धोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:24 AM2019-08-01T01:24:34+5:302019-08-01T01:24:59+5:30
महापालिका जबाबदारी घेणार का? : स्ट्रक्चरल आॅडिट झाले, पुढे काय?
ठाणे : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले, तर मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. त्यानंतर, ठाण्यासह जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ नगरपालिका हद्दीत आजच्या घडीला पाच हजार ५२ इमारती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.
धोकादायक इमारतींमध्ये लाखो रहिवासी आजही आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्यात आलेले आहेत. मात्र, रहिवासीसुद्धा त्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला १०३ अतिधोकादायक, तर ४२८० धोकादायक इमारती असून अतिधोकादायक इमारतींमधील ९९ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. कल्याणमध्ये ४७३ इमारती धोकादायक आहेत. उल्हासनगरमध्ये २०७ इमारती धोकादायक आहेत. 4280 धोकादायक इमारती एकट्या ठाणे महापालिका हद्दीत आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ हद्दीतील अशा इमारतींची संख्या ५0५२ आहे. पण पुढे काय? स्ट्रक्चरल आॅडिटसाठी रहिवासी पुढे येत नसल्याने हा प्रश्न सुटू शकला नाही.
तज्ज्ञ काय म्हणतात?
महापालिकेने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शिवाय, क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करून रहिवाशांचा टांगणीला लागलेला जीव सोडवला पाहिजे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. त्यावर उपाय झालेच पाहिजेत. -अनिल पाटील - माजी नगरअभियंता
महापालिकेची भूमिका
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच धोकादायक इमारतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी ९५ जणांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यासाठी रहिवासी पुढे येताना दिसत नाही.
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, अतिक्रमण
धोकादायक इमारतींचे
पुढे काय?
यावर्षी ज्या इमारती धोकादायक यादीत असतात, पुढील वर्षी त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. मात्र, उर्वरित इमारतींमध्ये आजही लाखो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. रहिवासीसुद्धा हक्काचे घर जाईल म्हणून इमारती खाली करीत नाहीत.