परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ५१ लाखांची फसवणूक : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:38 PM2019-04-23T22:38:18+5:302019-04-23T22:42:08+5:30
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळल्यानंतर त्यांना अनुजकुमार मलेशियाचा टुरिस्ट व्हिसा द्यायचा. प्रत्यक्षात तिथे कोणतीही नोकरी नसायची. लाखो रुपये घेऊनही त्यांचीच चौकशी सुरु व्हायची.
ठाणे : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या अनुजकुमार ठाकूर (२७, रा. उत्तर प्रदेश) आणि गौरवकुमार झा (२८, रा. बिहार) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने सोमवारी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ४० तरुणांकडून अशा प्रकारे ५१ लाख १० हजारांची फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनुजकुमार आणि त्याच्या साथीदारांनी कापूरबावडी, सिनेवंडर मॉल येथील एका गाळ्यामध्ये एम ग्रोथ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. नावाची कंपनी थाटली होती. याच कंपनीची यू-ट्युबवर जाहिरातही त्यांनी केली होती. मलेशियासारख्या देशात चांगल्या वेतनाची नोकरी असून त्याठिकाणी नोकरी लावण्याबाबतची व्हिडीओ क्लिप तयार करून ती ते यू-ट्युबवर टाकत असत. ती पाहून अनेक बेरोजगार तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यापैकीच विक्रमकुमार भाटी यांनाही त्यांनी असेच आमिष दाखवले. आॅक्टोबर २०१८ ते एप्रिल २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडून वेगवेगळ्या दिवशी टप्प्याटप्प्याने दोन लाख ६० हजारांची रक्कम घेतली. इतकी रक्कम घेऊनही त्यांना नोकरीलाही लावले नाही. शिवाय, वारंवार तगादा लावून त्यांना त्यांचे पैसेही परत केले नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भाटी यांनी याप्रकरणी २२ एप्रिल २०१९ रोजी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनुजकुमार आणि गौरवकुमार या दोघांना त्यांच्या सिनेवंडर मॉलमधील कार्यालयातून २२ एप्रिल रोजी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांची ५१ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
................................
तरुणांना दिला जायचा टुरिस्ट व्हिसा
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळल्यानंतर त्यांना अनुजकुमार मलेशियाचा टुरिस्ट व्हिसा द्यायचा. हाच व्हिसा घेऊन बेरोजगार तरुण मलेशियात जायचे. तिथे गेल्यानंतर मात्र कोणतीही अधिकृत नोकरी मिळण्याऐवजी त्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत होते. तशी अधिकृत कागदपत्रेही त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना मलेशियाच्या विमानतळावरूनच माघारी फिरण्याचे सूचित केले जात होते. अशा अनेकांची या भामट्यांनी फसवणूक केल्याचे आता तपासात समोर येत आहे.