गर्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या टोळीकडून ५१ मोबाइल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:53 PM2018-12-03T20:53:30+5:302018-12-03T20:59:15+5:30
जबरीने मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी याच्यासह सहा जणांच्या सराईत टोळीला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत.
ठाणे: एसटी, रेल्वे आणि बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणांसह रिक्षातून जाणारे प्रवासी तसेच पादचाºयांकडून जबरी मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी (२२, रा. कोपरी), प्रकाश कदम (३०, रा. राबोडी), अमित जगताप (३०, रा. ऐरोली) आणि उदयसिंग भंडारी (२२, रा. राबोडी ) आदी सहा जणांच्या सराईत गुन्हेगारांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यामध्ये परिमंडळ एकच्या विविध पथकांनी ३७ लाख ९८ हजार७५० रुपयांचे ३५१ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एका कायमस्वरूपी पथकाची स्थापना झोन एकचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या स्वामी यांनी मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाला मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाने झोन एकमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला. राकेश गुरुदासानीसारख्या सराईत सहा गुन्हेगारांकडून या पथकांनी चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले ५९ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना सोमवारी परत केले. हे मोबाईल परत मिळाल्यानंतर या फिर्यादींनी उपायुक्त स्वामी यांच्यासह तपास पथकाचे विशेष आभार मानले. ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डी. एस.स्वामी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक ए. आर. भंडारे, पोलीस उपनिरिक्षक जी.ए.केकाणे, पोलीस नाईक समाधान माळी, पोलीस नाईक आकाश जाधव, पोलीस नाईक एस. इ. चव्हाण, पोलीस शिपाई पी. बी. गादेकर, पोलीस हवालदार हिवाळकर यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन गेल्या तीन ही कामगिरी बजावल्याचे स्वामी यांनी सांगितले. या विशेष पथकाने गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३७ लाख ९८ हजार ७५० रुपयांच्या ३५१ मोबाईलचा शोध घेतला. यात परिमंडळ एक मधील चोरीच्या ३३ गुन्हयांमधील ३५ मोबाईल हस्तगत करुन २० आरोपींना अटक केली आहे.
‘‘ गहाळ झालेले किंवा चोरी झालेले मोबाईल परत मिळेल, याची अनेक सामान्य नागरिकांना शाश्वती नसते. परंतू, पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये नक्कीच एक विश्वास निर्माण होईल. यापुढेही ही मोहीम सुरु राहील. परंतू, नागरिकांनीही अशा घटना होत असतांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. संशयास्पद वस्तू दिसल्यास त्या पोलीस ठाण्यात आणून दिल्यास अनेक बाबी उघड होऊ शकता. तसेच साध्या वेषात राहून पोलिसांची कामगिरी दक्ष नागरिक घेऊ शकतात.’’
डॉ. डी. एस. स्वामी., पोलीस उपायुक्त, ठाणे शहर