मीरा भाईंदर शहराचा ५१६ कोटींचा पाणी वितरण प्रकल्प केंद्राच्या योजनेतून
By धीरज परब | Published: October 11, 2022 01:36 PM2022-10-11T13:36:33+5:302022-10-11T13:37:06+5:30
मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर शहरासाठी सूर्या योजनेतून पाणी आल्या नंतर त्याच्या ५१६ कोटींच्या शहरांतर्गत वितरण योजनेचे काम केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून राबवण्यात येणार आहे . केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाची मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे .
मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून एमएमआरडीए सूर्या योजने अंतर्गत सदर पाणी पुरवठा चेणे पर्यंत आणून देणार आहे . मात्र तेथून शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक आहे . जलवाहिन्या , साठवण टाक्या आदींच्या कामासाठी महापालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला .
परंतु इतका मोठा खर्च करण्यास महापालिका सक्षम नसल्याने शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत निधी मिळावा यासाठी आ . गीता जैन यांनी शासना कडे पाठपुरावा चालवला होता . त्या बाबत मंत्रालयात बैठक झाल्या होत्या व अखेर राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली होती .
शासनाने सदर प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केले . त्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मीरा भाईंदरच्या पाणी वितरण योजनेला केंद्राच्या अमृत योजेतून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला . यामुळे महापालिकेचा पैसे वाचणार असून योजना पूर्ण होताच नागरिकांना पाणी टंचाई पासून सुटका मिळणार असल्याचे आमदार गीता जैन यांनी सांगितले .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"