झाड पडल्याने ५२ वर्षीय नागरिक जखमी, ४ दुचाकींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:05 PM2022-08-13T12:05:05+5:302022-08-13T12:05:38+5:30
कळवा हॉस्पिटलमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले असून एक जण जखमी झाल्याची अशी माहिती दत्तात्रय कोल्हे नामक इसमाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली
ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या आवारात पडलेल्या झाडामुळे कळवा येथील रहिवासी असलेले राज नारायण दुबे (५२) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच ते झाड तेथे पार्क केलेल्या चार दुचाकींवर पडल्याने त्या दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कळवा हॉस्पिटलमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले असून एक जण जखमी झाल्याची अशी माहिती दत्तात्रय कोल्हे नामक इसमाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या घटनेत ५२ वर्षीय दुबे हे जखमी झाल्याचे समोर आले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पडलेल्या झाडामुळे चार वाहनांचे नुकसान झाले असून पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.