ठाण्यातील ५४ ठिकाणची धूळनियंत्रण यंत्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:45 PM2019-12-19T23:45:27+5:302019-12-19T23:45:32+5:30
पीपीपी तत्त्वाचा प्रयोग फसला : वर्षभरापासून प्रशासन ढिम्म
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील धुळीच्या प्रमाणाची माहिती ठाणेकरांना व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरातील तब्बल ५४ ठिकाणी धूळनियंत्रण यंत्रणा बसविली होती. पीपीपी तत्त्वावर ती कार्यरत होती. मात्र, मागील वर्षभरापासून ती धूळखात असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराने जाहिरातीपोटीचा रग्गड मलिदा लाटून पालिकेचे नुकसान केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केल्याची माहिती गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.
महासभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला नगरसेविका नंदिनी विचारे यांनी या विषयाला हात घातला. शहरात बसविण्यात आलेली धूळनियंत्रण यंत्रे सुरू आहेत का, त्यांची सध्याची काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी मागितला. परंतु, संबंधित यंत्रणा बंद असल्याची माहिती देऊन प्रदूषण नियंत्रण खात्याने संबंधितांचा ठेका रद्द केल्याचेही सांगितले.
महापालिकेने शहरातील १२ प्रमुख चौकांत ५४ धूळनियंत्रण यंत्रे तीन वर्षांपूर्वी बसविली होती. ठाणे स्थानक परिसर, तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी या ठिकाणी ती बसविली होती. याशिवाय, शहराच्या विविध भागांत आणखी दीडशे धूळनियंत्रण यंत्रे बसविण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र, प्रत्यक्षात ती अद्याप बसविलेली नसल्यामुळे पालिकेची घोषणा हवेत विरली आहे.
जाहिरात हक्कातून ठेकेदाराने कमविला रग्गड पैसा
च्गेल्या वर्षभरापासून शहरातील ५४ धूळनियंत्रण यंत्रे बंद असल्याची बाब गुरुवारच्या महासभेत उघड झाली. ही यंत्रे पीपीपी तत्त्वावर बसविली होती. त्यासाठी ठेकेदाराला जाहिरात हक्क दिले होते.
च्मात्र, देखभाल दुरु स्ती अभावामुळे ती बंद पडली असली, तरी ठेकेदार मात्र जाहिरातींच्या हक्कातून रग्गड पैसे कमावित होता, असा मुद्दा नगरसेवकांनी सभागृहात निदर्शनास आणला. त्यावर प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे ही यंत्रे बंद पडल्याचे सांगितले.
च्याबाबत वारंवार सूचना करूनही त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे त्याचा ठेका रद्द केला आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सभेत दिली.
आता बसविणार नवी वायुयंत्रणा : मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्र ॉन आकारमानाचे धुलिकण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम धूळनियंत्रण यंत्र करीत होते. त्यासाठी या यंत्रात विशिष्ट प्रकारचे पंखे बसविण्यात आले होते. ही यंत्रे पाच फूट उंच आणि अडीच फूट रु ंद होती. मात्र, ती देखभाल दुरु स्तीअभावी बंद पडल्याने त्याऐवजी आता मुंबईच्या धर्तीवर वायू नावाची यंत्रे बसविण्यासाठी पालिकेने चाचपणी सुरू केली आहे. ही नवी यंत्रे धुलिकण आणि वायुप्रदूषण रोखतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.