पालिकेला आली जाग, एमएमआरडीएकडून रस्त्यांसाठी ५५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:05 AM2019-05-07T02:05:00+5:302019-05-07T02:05:15+5:30
अंबरनाथ शहरातील चार प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ५५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, शहरातील ज्या रस्त्यांचे काम होणार आहे त्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेने काढून देणे गरजेचे होते.
- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथ शहरातील चार प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ५५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, शहरातील ज्या रस्त्यांचे काम होणार आहे त्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेने काढून देणे गरजेचे होते. त्यातच वर्षभरापासून रुंदीकरण न झाल्याने कामात अडथळा निर्माण झाला आहे. या रुंदीकरणाअभावी काही रस्त्यांची कामे सुरू देखील झालेली नाहीत. आता उशीरा का होईना पण पालिकेला जाग आली असून अधिकाऱ्यांचे एक पथक येथे कामाला लावले आहे.
चार वर्षांपासून ज्या फंडाची अपेक्षा पालिकेला होती, तो एमएमआरडीएचा फंड गेल्यावर्षी पालिकेच्या रस्त्यांसाठी आला देखील. त्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा देखील निघाल्या. शहरातील चार प्रमुख रस्त्यांसाठी ५५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. गेल्या पाच वर्षांत प्रथमच एमएमआरडीएकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला. त्यामुळे या रस्त्यावरील निधी खर्च होणे अपेक्षित होते.
वास्तविक, तीन वर्षांपासून रस्त्यांचा प्रस्ताव असल्याने त्या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध होणार, हे निश्चित असतानाही पालिकेने गेल्या तीन वर्षांत या रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, रुंदीकरण करणे या बाबींकडे लक्ष देण्याची गरज होती. एवढेच नव्हे तर गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया झाल्यावर किमान पालिकेने रस्त्यांचे विकास आराखड्याप्रमाणे रुंदीकरण करुन रस्ते मोकळे करणे गरजेचे होते. मात्र या कामासाठी एमएमआरडीएने कामाचे आदेश दिले असतानाही त्या रस्त्यांचे काम वेळेत सुरू झाले नाही.
नागरिकांचा संताप वाढल्यावर शिवाजी चौक ते लोकनगर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असतानाही पालिकेने रस्त्याचा मार्ग, रुंदीकरण आणि अतिक्रमण काढून देणे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. वर्ष उलटले तरी अजूनही पालिकेने रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतलेले नाही. हीच परिस्थिती अंबरनाथ बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्याची झाली आहे. या रस्त्याचे काम मंजूर होऊन आणि कामाचे आदेश मिळून वर्ष उलटले आहे. तरीही या रस्त्याचे साधे रुंदीकरण झालेले नाही. एवढेच नव्हे तर या रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमणही काढलेले नाही. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यावरुन स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासन यांच्यात वाद देखील झाले. या वादामुळे आता प्रशासनाने या दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अंतिम सीमारेषा देण्याचे काम सुरू केले आहे.
मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी नगररचना विभाग आणि अभियंत्यांच्या एका पथकाची या कामासाठी निवड करून त्यांना लोकनगर रस्त्याचे आणि फुलेनगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश प्राप्त होताच अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवार सकाळपासून लोकनगरी रस्त्यावर विकास आराखड्याप्रमाणे रुंदीकरणासाठी आवश्यक मार्किंग देण्याचे काम करत होते. ते काम उरकल्यावर बेथल चर्च या रस्त्यावरही अधिकाºयांनी मार्किंग देण्याचे काम सुरू केले आहे.
मार्किंग दिले जात असले तरी मे महिन्यात दिलेल्या मार्र्किं गनंतर त्यावर कारवाई होणार कधी हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यातच बेथल चर्च रस्त्यावर काही चाळी तुटत असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई होणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करुन देण्यात आलेली आहे. काँक्रिट रस्ता होईल येवढी जागा उपलब्ध आहे. उर्वरित रस्त्याची जागा निश्चित करुन त्यावरील अतिक्रमणकाढले जातील. तसेच फुलेनगर रस्त्यावरही अधिकारी वर्ग काम करित आहेत. ज्या ठिकाणी रस्ता मोकळा आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु करण्यासंदर्भात एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे.
- देविदास पवार, मुख्याधिकारी.
वर्ष उलटले तरी रस्त्याचे काम सुरु होत नाही. मोठ्या रस्त्यांसाठी निधी आला असतांना रस्त्यांवरील अतिक्रमण काढून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यांनी ते काम वेळेत केले असते तर रस्त्याचे काम सुरु झाले असते. वेळेत काम न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही. - उमेश पाटील, नगरसेवक.