‘मिलीबग’मुळे ५५ रेन ट्री धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:47 PM2017-07-26T23:47:40+5:302017-07-26T23:47:44+5:30
पूर्वेतील पेंढरकर कॉलेजसमोरील पाच ‘रेन ट्री’ना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. त्यामुळे ही झाडे सुकली आहेत. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसीकडे कोणतीही यंत्रणा नाही
डोंबिवली : पूर्वेतील पेंढरकर कॉलेजसमोरील पाच ‘रेन ट्री’ना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. त्यामुळे ही झाडे सुकली आहेत. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसीकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील जवळपास ५५ रेन ट्री जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
पेंढरकर कॉलेज येथील पाच ‘रेन ट्री’ रसायन टाकून मारल्याचा संशय ‘डोंबिवली रेसिडेन्सिअल वेल्फेअर असोसिएशन’चे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्तकेला होता. याप्रकरणी त्यांनी केडीएमसीचे ‘ई’ प्रभाग अधिकारी तसेच उद्यान विभागाकडे तक्रारकेली होती.
यासंदर्भात महापालिकेतील उद्यान अधीक्षक संजय जाधव म्हणाले, पेंढरकर कॉलेजजवळील झाडांना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. ही कीड झाडातील सगळा रस शोषून घेते. त्यामुळे झाडे निष्पर्ण होतात. कल्याण-डोंबिवलीतील ५५ झाडांना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका हद्दीतील हजारो ‘रेन ट्री’ना ‘मिली बग’ने ग्रासले आहे. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसारख्या यंत्रणेकडे कोणतीही उपाययोजना नाही, तर केडीएमसी त्याला काय पुरी पडणार, असे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले.
आपल्याकडील दमट वातावरण मिलीबग या किडीसाठी पोषक असल्याने ती ‘रेन ट्री’ची शिकार करतात. कल्याण-डोंबिवलीतील ५५ झाडे या ‘मिलीबग’ची शिकार झाली आहेत. पेंढरकर कॉलेजसमोरील पाच झाडे तसेच मनसे नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रभागातील दोन ‘रेन ट्री’ही पडले आहेत. तर, कल्याणच्या आधारवाडी कारागृहानजीकचे दोन ‘रेन ट्री’ही ‘मिली बग’च्या कचाट्यात सापडले आहेत.
‘मिलीबग’ ही केसाळ कीड आहे. ती झाडाचा रस शोषून घेते. त्यामुळे झाडे निष्पर्ण होऊन सुकतात. काही प्रसंगी झाड बुंध्यात फुटते. या विविध शक्यता आहेत. ‘रेन ट्री’ हे झाड उंच असल्याने उंच झाडावर कीटकनाशक फवारणी कशी करणार, ही अडचण असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावर कोणताच उपाय नसल्याने महापालिकेने ‘मिलीबग’विषयी हतबलता दर्शवली आहे.
दरम्यान, प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख निलेश भणगे यांनी सांगितले, ‘रेन ट्री ही झाडे ज्यांना नको आहेत, त्यांनी हा ‘मिलीबग’चा जावईशोध लावला आहे. त्यांना ही झाडे नष्ट करायची आहेत. त्यामुळे हा मिलीबग नसून मिलीभगत आहे, असा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संघटना तक्रार करणार आहे.’
पिठ्या ढेकूण अर्थात मिलीबग
पिठ्या ढेकूण ही कीड मिलीबग किंवा पांढरा ढेकण्या या नावानेही ओळखली जाते. या किडीच्या निरनिराळ्या प्रजाती महाराष्ट्रात आहेत. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.
या किडीच्या शरीराला मऊ कापसासारखे आवरण असल्याने कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचण्यास अडथळा येतो. त्यामुळे या किडीच्या बाल्यावस्थेतच जर कीटकनाशकांची फवारणी केली, तरच या किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. पिल्ले नारंगी रंगाची असतात.
हे कीटक झाडांवरील फळांवर, देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्ये शोषतात.