५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:01 PM2022-04-21T19:01:17+5:302022-04-21T19:01:36+5:30
झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती.
मुरबाड : तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांना रोजगाराचे साधन नसल्यामुळे ते जीवाची जोखीम पत्करून कोणतेही काम करत आहेत. झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा (वय ५५) ही आदिवासी महिला पोटाची खळगी भरण्यासाठी ५० फूट उंच बेलाच्या काटेरी झाडावर चढून बेलाची पाने काढत आहे. ही पाने कल्याण, ठाणे आणि मुंबई या शहरांत विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
कष्टकरी आदिवासींना कायमचा रोजगार नसल्यामुळे रोजगारासाठी त्यांना घाटमाथ्यावर असलेल्या आळेफाटा, जुन्नर, पुणे, नाशिक, जळगाव, पालघर याठिकाणी भटकंती करावी लागते. या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती खुंटलेली आहे.
झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती. तेव्हा तिला एक बेलाचे झाड दिसले. ही पाने देवपूजेसाठी वापरली जात असल्यामुळे तिने ती टोपली भरून घरी आणली आणि दुसऱ्यादिवशी ती पाने मंदिराशेजारी जाऊन विकली. त्यातून मिळालेले पैसे तिने आपल्या वडिलांच्या हातात दिले.
यानंतर हा तिचा कायमचाच रोजगार झाला. लग्न झाल्यानंतरही तिने हा व्यवसाय सुरू ठेवला. बांबूची ४० ते ५० फुटांची शिडी लावून ती बेलाची पाने काढते. तिचा पती शेतात काबाडकष्ट करत असताना ती पतीला आर्थिक हातभार लावत आहे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरीत्या सुरू आहे.
वयाच्या पंधरा वर्षांपासून मी हे काम करत आहे. वडिलांनी गावातच माझे लग्न लावून दिले. मी लग्नानंतरही हे काम सोडले नाही. आता पती, दोन मुले व नातवंडे असा परिवार असून, हा व्यवसाय त्यांचा आधार बनला आहे.
- कांताबाई सावरा