भिवंडीतून विदेशी मद्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: January 22, 2023 07:20 PM2023-01-22T19:20:58+5:302023-01-22T19:21:11+5:30
राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत बनावट मद्याचे गोदाम सील, मद्य वाहतूकीची बीएमडब्ल्यूही जप्त
ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्य दमण व हरियाणा राज्यांमधील निर्मित तसेच महाराष्ट्रातील बनावट विदेशी मद्य व बिअर साठयाचे गोदामांवर कारवाई करुन ते सीलबंद केले. अलिशान मोटार आणि मद्यासह ५६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून संदीप दावानी (३४, रा. उल्हासनगर) आणि हनुमंत ठाणगे(६२) या दोघांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिली.
बीएमडब्ल्यू कारचा मालक दीपक जयसिंघानी हा पसार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. जुन्या कपड्याच्या गोण्यांमध्ये लपवून हा मद्याचा साठा महाराष्ट्र राज्यात आणण्याचे तपासात उघड झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे तसेच कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे निरीक्षक संजय भोसले, ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे, अनिल पवार, राजेंद्र शिरसाठ, संजय गायकवाड तसेच दुय्यम निरीक्षक पूजा रेखे आदींच्या पथकाने २२ जानेवारी रोजी ही कारवाई केली.
भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघा रोडवरील बापगाव येथील गाळा क्रमांक पाच येथील गोदामात मद्याची साठा केल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे या पथकाने पाच ठिकाणी साठा केलेल्या बनावट मद्याच्या साठ्यांचे २६६ बॉक्स जप्त केले. यावेळी संदीप आणि हनुमंत या दोघांना अटक केली. सखोल चौकशीमध्ये या पथकाला कल्याण मुरबाड रोडवर व्हरटेक्स स्कायव्हिला या इमारतीच्या १००३ या पार्र्किं गमध्ये विदेशी मद्य भरलेली मोटारकार उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून कारमधील २५ बॉक्स सह २९९ बॉक्स व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी त्रिकुटाविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.
पसार झालेल्या दिपक याच्या नावाने ही बीएमडब्ल्यू कार असून त्यांच्या नावावर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांमध्ये हे वाईन शॉप आहे. त्या कारमधून २५ मॅकडोवेल दमण निर्मित मद्याचे बॉक्स घराच्या पार्किंग मधून जप्त केले. या घटनेची माहिती मिळताच मुख्य संशयित आरोपी दीपक जयसिंधानी याने पोबारा केला असून त्याला पकडण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.