कळवा खाडीतील ५७ झोपड्या जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:33 AM2022-07-26T07:33:40+5:302022-07-26T07:34:11+5:30
रहिवाशांच्या विरोधानंतरही पालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा खाडीतील कांदळवन नष्ट करणाऱ्या बेकायदा झोपड्यांवर अखेर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ५७ झोपड्या तोडल्याची माहिती महापालिकेने दिली. या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला. मात्र, पोलीस बंदोबस्तात कारवाई झाली. या कारवाईसाठी तहसील विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते.
खाडीलगत शेकडो बांधकामे उभी राहिली असून, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. खाडीकिनारी बेकायदा उभारलेल्या या झोपड्यांसंदर्भात कोकण विभागीय कार्यालयात बैठक झाली होती. यात खाडीपात्रात खारफुटीची कत्तल करून उभारलेल्या झोपड्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडेही बैठक होऊन कारवाईबाबत निर्णय झाला. सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी आणि मनपा यांनी कारवाईला सुरुवात केली. जुन्या ब्रिटिशकालीन कळवा उड्डाणपुलाच्या खाली, पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या खाडीपात्रात ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात ५७ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ठामपाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे.
‘पुन्हा खारफुटी लावण्यात येणार’
कळवा खाडीपात्रात आणि आजूबाजूच्या परिसरात ५०० ते ७०० झोपड्या बेकायदा उभ्या राहिल्या आहेत. गेल्या २० वर्षांत या झोपड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधाही दिल्या आहेत. या ठिकाणी कनेक्शन तोडायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही यापूर्वी झाले आहेत. आता कोकण विभागीय कार्यालयाच्या निर्देशानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात झाली असून, या ठिकाणी पुन्हा खारफुटी लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.