जिल्ह्यात सापाच्या ५७ जाती, चार साप विषारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:09+5:302021-06-17T04:27:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रमाणही आता वाढताना दिसणार आहे. साप चावण्याचे प्रकारही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रमाणही आता वाढताना दिसणार आहे. साप चावण्याचे प्रकारही पावसाळ्यात जास्त असते; परंतु प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही. ठाणे जिल्ह्याचा विचार केला, तर या जिल्ह्यात सापाच्या तब्बल ५७ जाती आढळून येत आहेत; परंतु त्यातील अवघे चार साप हे विषारी असून, उर्वरित निमविषारी आणि बिनविषारी आहेत. मात्र, यातील कोणताही साप माणसाला चावला, तर तो विषारी आहे की बिनविषारी आहे, याची माहिती नसल्याने तो घाबरल्याने त्याला अधिक त्रास होत असल्याचेही दिसून आले आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांत नाग, घोणस, मन्यार, फुरसा हे चार सर्वांत विषारी आहेत.
खाडीकिनारी अथवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात परिसरात झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे, साप नागरी वस्त्यांमध्ये शिरताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ५७ प्रकारचे साप असून, त्यापैकी घोणस, मण्यार, फुरसे, नाग, चापड्यासारखे विषारी साप असून, उर्वरित निमविषारी तर काही बिनविषारी साप आहेत. साप हे साधारण २८ ते ३४ अंश तापमानात वावरत असताना आता हे तापमान वाढले की, हे साप गारव्यासाठी सोसायटीतील झाडीझुडपात येतात, तर कधी उंदीर, घूस या प्राण्यांचा मागोवा घेत वस्तीत येतात. त्यात पावसाळा सुरू झाला की, ते बाहेर येण्याचे प्रमाण वाढते. त्यातूनच सर्पदंश होऊन अनेकांना त्रास होताे. प्रत्येक साप हा विषारी असतोच, असे नाही, तर अनेक साप हे बिनविषारी आणि निमविषारीदेखील असल्याचे सर्पमित्र सांगतात. त्यांच्यापासून भीती नसली तरी त्याचे ज्ञान असणे गरजेचे असते. ते असेल तर सापाची भीती कमी होण्यास मदत होते.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग- ठाणे जिल्ह्यात आढळणारा हा विषारी साप आहे. याचा रंग हा पिवळा असून, डोक्याच्या पाठीमागे काळसर आकडा असतो. त्याच्या जवळ गेल्यास फणा काढून इशारा देतो.
मन्यार- हा निषाचर असल्याने मन्यार हा रात्री बाहेर पडणारा साप आहे. त्याच्या मानेच्या मागे चार बोटे ठेवून आडवे पट्टे असतात. ते शेपटीपर्यंत असतात.
घोणस- घोणसच्या अंगावर रुद्राक्षांच्या माळा असतात, तसेच ती कूकरच्या शिटीसारखा आवाज करते.
फुरसा- हाताची वीत होईल एवढा छोटा आकार या सापाचा असतो. त्याच्या डोक्यावर बाणाकृती निशाणी असते. त्यावरून तो ओळखता येतो; परंतु त्या तुलनेत अधिक विषारी असणारा साप आहे.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
वाळा, खापरखवल्या, अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, तस्कर, कवड्या, नानेटी, कुकरी, धामण, धूळनागीण, चित्नांग नायकूळ, गवत्या, रुखई, काळतोंड्या, पानधिवड आदी.
निमविषारी साप- श्वानमुखी, झिलाण, मांजऱ्या, रेतीसर्प, हरणटोळ.
साप आढळला तर...
एखाद्या परिसरात साप आढळला, तर तो कोणत्या जातीचा आहे, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना साधारणपणे त्याची माहिती नसते. त्यामुळे त्यांना हा साप कुठे आहे, कुठे जाण्याची शक्यता आहे. झाडावर आहे, घरात आहे, याची माहिती ठेवावी. त्यानंतर तत्काळ सर्पमित्र किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवावे, तसेच एका माणसाने त्या सापावर लक्ष ठेवावे आणि दुसऱ्याने फोनद्वारे सर्पमित्राला संपर्क साधावा. त्यातही साप दिसल्यानंतर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घाबरून जाऊ नये.
साप चावला तर...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साप चावल्यावर घाबरून जाण्याची काही गरज नाही. मानसिक आधार देणे गरजेचे. साप चावला, तर थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आता सांगितले जात आहे; परंतु यापूर्वी तो चावल्याच्या ठिकाणी पाणी ओतणे, पट्टी बांधणे, हात ठेवणे, क्रेब बॅण्डेज बांधणे हे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तत्काळ उपचारार्थ दाखल करावे.
........
साप चावल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे, हा महत्त्वाचा उपचार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, तसेच ज्याला तो चावला असेल त्यास मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यातून उपचारालादेखील प्रतिसाद मिळून सर्पदंश झालेली व्यक्ती लवकर बरी होऊ शकते.
(कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)
ठाणे जिल्ह्यात ५७ प्रकारचे साप आढळतात. त्यात ४ साप हे विषारी आहेत; परंतु आता पावसाळ्यात बाहेर निघण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा वेळेस घाबरून न जाता, याची माहिती तत्काळ सर्पमित्राला देणो गरेजेचे आहे, तसेच एखाद्याला सर्प चावलाच, तर त्याच्यावर शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचारार्थ दाखल करावे.
(अनिल कुबल, सर्पमित्र, ठाणे)