मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली ५७ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:46+5:302021-04-27T04:41:46+5:30
मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने ...
मीरा रोड : बेजबाबदार लाेकांकडून मास्क न लावणे, गर्दी करणे, नाहक फिरणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा वेगाने फैलाव हाेत आहे. या बेजबाबदार लोकांना वठणीवर आणण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढाेले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके नेमली आहेत. काेराेनाचे रुग्ण आटाेक्यात आणण्यासाठी महापालिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी केल्यास त्याचे चांगले परिणाम शहरात दिसतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक ते उपाय व सुविधा नागरिकांना देत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा व पालिकेच्या इतर यंत्रणांवर ताण येत आहे. मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदींपासून महापालिका कार्यालयातही वावरतात. विनाकारण बाहेर फिरणे, भाज्या-मासळी खरेदीसाठी गर्दी करणे, खाण्या-पिण्याच्या ठिकाणी विनामास्क गर्दी करून राहणे आदी प्रकारांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त ढोले यांनी पोलीस व पालिका प्रशासनासाेबत ही पावले उचलली आहेत. आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी सुरुवातीला १७ पथके नेमली होती. मात्र ही पथके कमी पडत असल्यामुळे आणखी ४० पथके आयुक्तांनी नव्याने नेमली आहेत. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षारक्षक यांच्यासह एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांचा समावेश आहे. या पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय नेमण्यात आले आहेत.
ही पथके त्यांच्या प्रभागात गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करणार आहेत. विनामास्क वा मास्क व्यवस्थित घातलेला नसेल, गर्दी केली असेल्, बंदी असतानाही दुकाने-आस्थापना खुली असतील, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
‘शिस्त लावण्यासाठी पथकांची नेमणूक’
केंद्र व राज्य शासन तसेच महापालिका व पोलिसांमार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमनिर्देशांचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे. जागरूक नागरिक त्या आवाहनानुसार नियमांचे पालन करून संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. अनेक लोक नियमांचे पालन करत नसल्याने संसर्ग पसरण्यास मोठे कारण ठरत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाईसाठी पालिका व पोलिसांनी मिळून पथके नेमली आहेत, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.