कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ग्रामीण भागात ५७१५ बेडची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:35+5:302021-07-08T04:26:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार विलगीकरण, जनरल, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवण्याची तयारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केली आहे. ग्रामीण भागातही त्यादृष्टीने पावले उचलली असून, ग्रामीण भागातही लहान मुलांसाठी बेडची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागात शासकीय १६ आणि खासगी ५ अशा पद्धतीने रुग्णालये सज्ज असून, त्याठिकाणी एकूण चार हजार ४७० कोरोनाबाधित रुग्णांसाठी, तर लहान मुलांसाठी एक हजार २४५ बेडची व्यवस्थाही केली आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण गेले. कुठे ऑक्सिजनची कमतरता भासली. परंतु, आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील यंत्रणादेखील सज्ज ठेवून जास्तीचे बेड उपलब्ध केले आहेत. त्यातही तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना अधिक असल्याने त्या दृष्टीने मुलांसाठी वेगळ्या बेडची व्यवस्था केली आहे.
ठाण्यातच लहान मुलांसाठी २०० बेड
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ठाण्यातील मनोरुग्णालयाशेजारी असलेल्या जागेत १०० बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवले आहेत, तर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग प्लाझा कोविड सेंटर येथे १०० बेड सज्ज ठेवले आहेत.
असे आहेत ग्रामीण भागातील बेड संख्या
जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित इतर रुग्णांसाठी चार हजार ४७० बेड आणि लहान मुलांसाठी एक हजार २४६ बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. लहान मुलांच्या एक हजार २४५ बेडमध्ये विलगीकरणाचे ७०० बेड, ऑक्सिजनचे ४५५, आयसीयूचे ५०, खासगी रुग्णालयात ३० आयसीयूचे आणि व्हेंटिलेटरचे १० बेड सज्ज ठेवले आहेत.