जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: September 15, 2022 07:29 PM2022-09-15T19:29:30+5:302022-09-15T19:30:30+5:30

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. 

58 crore fraudster has been arrested with the lure of extra refund | जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Next

ठाणे : मासिक भिशी योजनेद्वारे १८ टक्के जादा परताव्याचे अमिष दाखवून तब्बल ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या एस कुमार ज्वेलर्सच्या श्रीकुमार शंकरा पिल्लई वय ६८ या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली. या आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पिल्लई याने एस. कुमार ज्वेलर्स आणि एस. कुमार गोल्ड ण्ड डायमंड या नावाने सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने महाराष्ट्र राज्यासह देशातील इतर ठिकाणीही त्याची कार्यालय थाटली होती. अशाच प्रकारचे कार्यालय कल्याण पश्चिमेकडील झोझवाला हाऊस, शिवाजी चौक येथेही सुरु केले होते. त्याच्या दुकानात दागिने खरेदीसाठी येणाऱ्या गिऱ्हाईकांना तसेच दलालांमार्फत गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे त्याने अमिष दाखविले होते. गुंतवणूकदारांनी ११ महिने रक्कम भरल्यास बाराव्या महिन्याची रक्कम ही त्याने ज्वेलर्सच्या मार्फतीने भरुन जमा होणाऱ्या रकमेचे सोने खरेदी करता येईल, असे सांगितले होते. 

तसेच एक वर्षाच्या मुदतठेवी पोटी गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा म्हणून सुमारे १६ ते १८ टक्के दराने व्याज देण्याचेही अमिष दाखविले होते. अशा वेगवेगळया योजनांची बतावणी करीत अनेकांना गुंतवणुकीस त्याने प्रवृत्त केले. एक वर्षांच्या ठेवी स्वीकारल्यानंतर त्यांची मुदत संपल्यानंतरही मूळ रकमेसह मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही पुन्हा मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यास तो प्रवृत्त करीत होता. गुंतवणुकदारांपैकीच एकाने त्याच्या योजनेमध्ये दहा हजार रुपये गुंतविले होते. 

मुदतीनंतरही योग्य परतावा न मिळाल्याने त्याने याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण करण्याच्या अधिनियमाप्रमाणे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाले होते. त्याने आतापर्यंत एक हजार २१६ गुंतवणूकदारांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ इतकी फसवणूक केली आहे. परंतु, ही रक्कम ७० कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मालमत्तेची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात
पिल्लई तसेच त्याच्या कंपनीच्या नावाने विविध बँकेतील २४ खात्यांमधील १२ लाख ८४ हजार ४७६ इतकी रक्कम गोठविली आहे. त्याच्या मालकीच्या संरक्षित केलेल्या मालमत्तेची सध्याची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे. त्याला अशाच एका गुन्ह्यात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनेही अटक केली होती. हीच माहिती मिळाल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या पथकाने त्याला १३ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या संमतीने मुंबईतून अटक केली.

गुंतवणुकदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन
या योजनेमध्ये पिल्लई याच्याकडे मोठया प्रमाणात लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत व फसवणूक झालेल्यांच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांनी या योजनेमध्ये गुंतवणुक केली असेल त्यांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 


 

Web Title: 58 crore fraudster has been arrested with the lure of extra refund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.