‘रिंग रोड’च्या आड येणारी ५८ अतिक्रमणे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:25+5:302021-03-20T04:40:25+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याआड येणारी ५८ अतिक्रमणे मनपाच्या ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याआड येणारी ५८ अतिक्रमणे मनपाच्या कारवाई पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केली आहेत. मनपाचे प्रभाग अधिकारी भरत पवार, देविदास दापोडकर, विजय भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कल्याण-डोंबिवली रिंग रोड प्रकल्पाचा मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी हा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यातील विकासकामाआड येणारी माणकोली येथील ५८ घरे शुक्रवारी जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मनपाने कारवाईवेळी नागरिकांचा विरोध होणार हे गृहीत धरून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कारवाईच्या आधी मनपाने अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावल्या होत्या.
रिंग रोड प्रकल्प आणि मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा खाडीपूल एमएमआरडीएकडून बांधण्यात येत आहे. या पुलाच्या डोंबिवलीच्या दिशेकडील काम पूर्णत्वास आले आहे. तर, भिवंडी दिशेकडील खाडीतील कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या खाडीपुलाला पोहोच रस्ताही विकसित केला जात आहे. या खाडीपुलाला जोडूनच हा रिंग रोड आहे. त्यामुळे रिंग रोडमार्गे खाडीपुलावरून ठाणे गाठणे शक्य होणार आहे.
----------------