भिवंडी प्रांत कार्यालयातील ५८ लाख फसवणूक प्रकरण; आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या सहावर
By नितीन पंडित | Published: November 23, 2022 05:48 PM2022-11-23T17:48:34+5:302022-11-23T17:49:25+5:30
अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर.
मुंबई वडोदरा महामार्गात मयत जमीन मालकाचा भूसंपादीत जमिनीचा मोबदला फसवणूक करून बळकावल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना मंगळवारी अटक केली आहे. त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये दुगाड गावच्या सारपंचाचेही नाव आले आहे. राजेश वाल्या भोईर असे अटक सरपंचाचे नाव असून त्यासोबत मोहमद तहा अनीस मोमीन, मोहमद अमीन अनीस मोमीन या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या बाबत शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांनी सांगितले की,या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली असता त्यांच्या चौकशीत जी नावे समोर आली त्यानुसार दुगाड ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश वाल्या भोईर यांनी भागीरथी मुकणे मयत ठकी सवर हीच्या नावाचा बोगस रहीवाशी दाखला दिला आहे. मोहमद तहा अनीस मोमीन याने बनावट आधारकार्ड बनवण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर मयत ठकी सवर हीस ओळखतो म्हणून सही केली आहे. तर आरोपी मोहमद अमीन अनीस मोमीन याने गॅझेट बनवून बनावट आधार कार्ड काढून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी या तिघांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिन्ही आरोपींना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता अजूनही आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याने आरोपींच्या गोटात खळबळ माजली आहे.