कोरोनामुळे बेघर झालेल्या ५८ वर्षीय महिलेला मिळाला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:01+5:302021-05-21T04:43:01+5:30

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील ...

A 58-year-old woman who became homeless due to corona got shelter | कोरोनामुळे बेघर झालेल्या ५८ वर्षीय महिलेला मिळाला निवारा

कोरोनामुळे बेघर झालेल्या ५८ वर्षीय महिलेला मिळाला निवारा

Next

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील तरुणाईने निवारा मिळवून दिला.

या महिलेचे तौक्ते चक्रीवादळामुळे सर्व सामान भिजून गेले, अगदी डोक्यावर बांधलेले छप्पर देखील उडाले. ठाण्यातील काही तरुण तरुणींच्या नजरेस ही महिला पडली तेव्हा त्यांनी तिची रीतसर माहिती काढून शहानिशा करून ठाणे महापालिका आणि अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या निवारा केंद्रात दाखल केले. अजय भोसले आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कमलाबाई दळवी असे या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री देशमुख हिला त्या प्रथम दिसल्या. बसस्टॉपवर ती सहा महिने त्यांना पाहत होती. पाच दिवसांपूर्वी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे तिची झालेली परिस्थिती पाहून तिने विचारपूस केली. त्यावेळी त्यांना कोणीही नसल्याचे तिने सांगितले. पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करीत होती. लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले आणि घरभाडे थकल्याने घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्यावेळी त्या हॅप्पी व्हॅली समोरील सहयोग बस स्टॉपसमोर राहायला आल्या. पाऊस आला म्हणून भाग्यश्री त्यांना छत्री द्यायला गेली त्यावेळी वादळ सुटले होते. त्यांना तिने स्वखर्चातून ताडपत्री दिली पण सोसाट्याचा वारा सुटल्याने ते उडून गेले. म्हणून या महिलेसाठी निवारा शोधण्याचे तिने प्रयत्न केले. समता विचार प्रसारक संस्थेचा कार्यकर्ता अजय भोसले याला ही घटना कळल्यानंतर त्याने भाग्यश्रीशी संपर्क साधून त्या महिलेने सांगितलेल्या हकिकतीची सर्वप्रथम शहानिशा केली. पावसात त्यांचे सर्व सामान भिजले असल्याने भाग्यश्रीने स्वखर्चातून त्यांना कपडे, बॅग, खाण्याचे समान विकत घेतले. आरती भोर यांनी त्या महिलेसाठी मोफत ब्लाऊज शिवून दिले. अमोल जाधव हे त्यांच्या जेवणाची सोय करतच होते. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. त्यांना आश्रमात ठेवण्याचा विचार अजयने केल्यानंतर काही आश्रममधून पैशाची मागणी झाल्याने अजयने तो विचार सोडला. परंतु, हिंमत न हारता शोध सुरू ठेवला. त्याने धर्मवीर आनंद दिघे विचार मंच व सेवाचे संस्थापक जयदीप कोर्डे यांना संपर्क केला त्यावेळी मनपाच्या निवारा केंद्राचा त्यांनी संदर्भ दिला. बुधवारी अजयने दळवी यांना आश्रमात दाखल केले. सुरुवातीला त्यांची मानसिक तयारी नव्हती. व्यवस्थित समजून सांगितल्यावर त्या तयार झाल्याचे अजयने सांगितले. निवारा केंद्राचे व्यवस्थापक संदीप सरदार म्हणाले की, दळवी यांना काही काळ ठेवले जाईल. पुढे चांगल्या ठिकाणी सोय झाल्यावर त्या ठिकाणी पाठवले जाईल. दळवी यांच्याशी संपर्क केल्यावर त्या म्हणाल्या, माझा पहिला दिवस चांगला गेला आहे.

या मदतीसाठी समता विचार प्रसारक संस्था व कार्यकर्ते सायली साळवी, दर्शन पडवळ, इनोक कोलीयर, रवी इसाक, ओम गायकवाड, शुभम कोळी यांनीही मोलाची मदत केल्याचे अजयने सांगितले.

-------------/--

Web Title: A 58-year-old woman who became homeless due to corona got shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.