पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत नेण्याची गरज; एसी लोकलचे भाडे कमी करा- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 11:46 AM2022-03-19T11:46:50+5:302022-03-19T11:46:54+5:30

साध्या लोकल वाढवा

5th-6th route needs to be extended to Mumbai; Reduce AC local fares -MP Shrikant Shinde | पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत नेण्याची गरज; एसी लोकलचे भाडे कमी करा- श्रीकांत शिंदे

पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत नेण्याची गरज; एसी लोकलचे भाडे कमी करा- श्रीकांत शिंदे

googlenewsNext

डोंबिवली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी रेल्वे संबंधित अनुदान मागणी संदर्भातील चर्चेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सहभाग घेत आपल्या मतदारसंघातील विकासकामे, उपनगरी रेल्वे सेवा व प्रवाशांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत न्यावी, एसी लोकलच्या भाड्यात कपात करा, साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या.

दिवा-ठाणे दरम्यानची पाचवी-सहावी मार्गिका नुकतीच सुरू झाली आहे. सध्या या मार्गांवरून एसी लोकल चालविण्यात येत आहेत. १ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान एसी लोकलने ६५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. हे प्रमाण या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ५० टक्क्यांहून खूप कमी आहे. एसी लोकलचे भाडे सेकंड क्लासच्या रेल्वे प्रवासाच्या १० पटींने अधिक आहे, तर फर्स्ट क्लासपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे एसी लोकलचे भाडे कमी करावे. तसेच साध्या लोकलच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत असलेल्या या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे जमिनींवर बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेने या जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु, हे रहिवासी ४० ते ५० वर्षे व त्याहूनही अधिक काळ तेथे राहत असल्याने त्यांचे पुर्नवसन करावे. या संदर्भात नुकतीच मुंबईत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी एमएमआरए क्षेत्रातील खासदार व आमदारांनी भेट घेतली. 

यावेळी केंद्र, राज्य सरकार, रेल्वे आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रितपणे योजना राबवून या नागरिकांचे पुनर्वसन करावे. तोपर्यंत या रहिवाशांना नोटिसा पाठवू नयेत, ही मागणी दानवे यांनी मान्य केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा रेल्वेने या रहिवाशांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे पुनर्वसनाचा मार्ग सुटत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.

Web Title: 5th-6th route needs to be extended to Mumbai; Reduce AC local fares -MP Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.