उल्हासनगरात दोन दिवसात हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या ६ गुंडांना अटक
By सदानंद नाईक | Published: June 24, 2023 03:43 PM2023-06-24T15:43:01+5:302023-06-24T15:43:11+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यातील शहाड फाटक परिसरात राहणारा बदल हसमुख पटेल हा हद्दपारीचा भंग करून शहाड उड्डाण पुलाखाली उभ्या असतांना २३ जून रोजी पोलिसांनी अटक केली.
उल्हासनगर : शहरातील पोलिसांनी गेल्या दोन दिवसात हद्दपारीचा भंग करणाऱ्या तब्बल ६ गुंडांना अटक करून गुन्हे दाखल केले. हद्दपारीची कारवाई झालेले गुंड शहरातच राहत असल्याची चर्चा काही दिवसांपासून होत होती. उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ मधून शेकडो गुंडावर हद्दपारीची कारवाई पोलीस आयुक्तालयाने गेल्या दोन वर्षात केली. मात्र काही गुंड विनापरवाना हद्दपारिचा भंग करून शहरात राहत असल्याची ओरड काही दिवसांपासून होत होती.
उल्हासनगर पोलीस ठाण्यातील शहाड फाटक परिसरात राहणारा बदल हसमुख पटेल हा हद्दपारीचा भंग करून शहाड उड्डाण पुलाखाली उभ्या असतांना २३ जून रोजी पोलिसांनी अटक केली. तसेच राजा उर्फ सीकेपी हैरी तिगया यालाही तेजुमल चक्की परिसरातून हद्दपारीचे उल्लंघन केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. मध्यवर्ती पोलिसांनी हिराघाट पंचशीलनगर येथे राहणारा अजय दिलीप चव्हाण यालाही हद्दपारीचे उल्लंघन केल्या प्रकरणी चाकूसह अटक केली. तर फॉरवर्ड लाईन परिसरात राहणाऱ्या बॉबी किशोरसिंग लबाना हाही हद्दपारीचे भंग केल्याप्रकरणी इमली पाड्यातून मध्यवर्ती पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विकी वाल्मिकी पगारे याच्यावर पोलिसांनी चार जिल्हयातून हद्दपार केले होते. २३ जून रोजी रघुनाथनगर येथून त्याला हद्दपारीचे उल्लंघन केल्या प्रकरणी अटक करून गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत सिद्धार्थ वॉटर सप्लाय परिसरात राहणाऱ्या उपेंद्र उर्फ उप्पी लिंगापा कलवाला याला चार जिल्ह्यातून हद्दपार केले होते. २३ जून रोजी छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूल खालुन हद्दपारीचे भंग केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. दोन दिवसात हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६ गुंडांना अटक करून गुन्हा दाखल केला. तसेच हद्दपरीची कारवाई करणाऱ्या गुंडाची सध्यस्थीत चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे.