६ वर्षीय मुलीचा मृत्यू, अनधिकृत स्विमिंग पूल तोडण्याची अखेर ५० दिवसांनी पालिकेला उपरती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 09:30 PM2022-05-22T21:30:10+5:302022-05-22T21:30:34+5:30
आयसीसीआय बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सह कुटुंब एक ग्रुप चौकच्या डोंगरावरील यूटर्न रिसॉर्ट परिसरातील २५ क्रमांकाच्या बंगल्यात पर्यटनसाठी आला होता.
मीरारोड :-
भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील एका रिसॉर्ट परिसरातील बंगल्याच्या अनधिकृत तरण तलावात पडून ६ वर्षीय चिमुरडीचा बळी गेला असताना त्या अनधिकृत स्विमिंग पुलावर तोडक कारवाईसाठी मीरा भाईंदर महापालिकेला तब्बल ५० दिवसांनी कारवाई करण्याची उपरती झाली. शनिवारी पालिकेने सदर अनधिकृत स्विमिंग पूल तोडला.
आयसीसीआय बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सह कुटुंब एक ग्रुप चौकच्या डोंगरावरील यूटर्न रिसॉर्ट परिसरातील २५ क्रमांकाच्या बंगल्यात पर्यटनसाठी आला होता. त्यावेळी तेथील स्विमिंग पूल मध्ये दहिसरच्या नाडकर्णी कुटुंबातील गीतिका हि ६ वर्षाची चिमुरडी स्विमिंग पूल मध्ये पडून मरण पावली होती.
उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी व पथकाने तपास केला असता सदर बंगलाच्या स्विमिंग पूल ला महापालिकेचे परवानगीच नव्हती . तसेच त्याठिकाणी लाईफगार्ड, सुरक्षा रक्षक व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याने गीतिका हीच बळी गेल्याचे समोर आले.
११ एप्रिल रोजी गीतिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा भाऊ अशोक आनंदा शेट्टी सह सोनाली केवलरामनी, व्यवस्थापक सेवियो आणि मिट्टू पुरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु ६ वर्षाच्या चिमुरडीच्या बळीला कारणीभूत ठरणार स्विमिंग पूल अनधिकृत असल्याचे उघडकीस येऊन देखील महापालिका मात्र त्यावर तोडक कारवाई करत नव्हती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षीय गीतिकाच्या बळी ला कारणीभूत बेकायदा रिसॉर्ट व बांधकामा प्रकरणी लेखी तक्रार केली होती.
गीतिकाच्या मृत्यू ला ५० दिवस उलटून गेल्या नंतर अखेर महापालिकेला त्या अनधिकृत स्विमिंग पुलावर कारवाईची जाग आली. शनिवारी पोलीस बंदोबस्तात महापालिकेने तो स्विमिंग पूल यंत्रांच्या सहाय्याने पूर्णपणे तोडून टाकला. आधीच ह्या अनधिकृत स्विमिंग पुलावर महापालिकेने कारवाई केली असती तर गीतिकाचे प्राण वाचले असते. गंभीर बाब म्हणजे बळी गेल्या नंतर देखील स्विमिंग पूल तोडण्यासाठी महापालिकेला ५० दिवस का लागले? असा सवाल नागरिकां मधून केला जात आहे.