उल्हासनगरात मोटारसायकलच्या धडकेत ६ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:12 PM2021-09-14T14:12:35+5:302021-09-14T14:12:54+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ आंबेडकर चौक परिसरातील एका इमारती मध्ये अशोक गौतम हे वॉचमनचे काम करतात. शनिवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडून बुद्ध भूषण इमारतीची पाणी मशीन सुरू करण्यास जात होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : आंबेडकर चौक परिसरात शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता वडिलां पाठोपाठ रस्ता ओलांडणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुरडीला मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक देऊन पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या इशितावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ आंबेडकर चौक परिसरातील एका इमारती मध्ये अशोक गौतम हे वॉचमनचे काम करतात. शनिवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडून बुद्ध भूषण इमारतीची पाणी मशीन सुरू करण्यास जात होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांची ६ वर्षाची मुलगी इशिता रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव आलेल्या एका मोटार सायकलस्वाराने जोरदार धडक मुलीला देऊन मोटारसायकलसह पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या इशितावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज देत असतांना मंगळवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात स्थानिक नागरिकांनी व नगरसेवकांनी संताप व्यक्त करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी नागरिक व नगरसेवकांची समजूत काढून आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले.
आंबेडकर चौक परिसरातील शेकडो नागरिकांनी मंगळवारी रात्री इशिताला श्रद्धांजली वाहिल्यावर, कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले. आंबेडकर चौक, सुभाष टेकडी व कुर्ला कॅम्प परिसरात मद्यधुंद तरुण भरधाव मोटारसायकल चालवित असल्याने, यापूर्वीही या परिसरात अपघात झाले आहे.