नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:32 IST2025-02-25T08:32:17+5:302025-02-25T08:32:24+5:30
महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे शहरातील जनता दरबारावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा वाद रंगला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात ६०० हून अधिक नागरिकांनी व्यथा मांडल्या. पहिल्याच जनता दरबाराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नाईक यांनी, आपला जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
नाईक म्हणाले, मी १९९५ मध्ये मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. आपली गाऱ्हाणी घेऊन सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच जनता दरबार घेतला, असे नाईक म्हणाले. जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईकांनीही जनता दरबार घ्यावा
पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, याबद्दल नाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या, तर त्या सुटतील.
स्वबळावर महापालिका निवडणूक लढायला आवडेल; पण...
ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा आहे, असे माजी खा. संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
आता वनमंत्री नाईक यांनीही, मला स्वबळावर निवडणूक लढायला आवडते; पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.