डायलेसीस करण्यासाठी आलेल्या ६१ वर्षीय वृध्दाचा महापालिकेच्या डायलेसीस सेंटरमध्ये मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:24 PM2018-06-27T18:24:55+5:302018-06-27T18:29:28+5:30
डायलेसीस करण्यासाठी ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा कोपरी येथील महापालिकेच्या डायलेसीस सेंटरमध्ये मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यु झाल्याचा दावा मयतांच्या नातेवाईंकांनी केला आहे. परंतु दुसरीकडे त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने मृत्य झाला असावा असा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील डायलेसीस सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्य झाल्याची घटना बुधवारी घडली असून डायलेसिस सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. नरेंद्र वाजीराने (६१) असे मृत झालेल्या रुग्णाचे नाव आहे. रु ग्णाला आॅक्सिजन लावताना टेक्निशयनने विलंब लावला असल्यानेच रु ग्णाचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र या प्रकारामुळे रु ग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांना नातेवाईक व स्थानिक नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. रुग्णाला रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे या दरम्यान रक्तदाबाचा त्रास होऊन मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
रु ग्णांना माफक दारात डायलेसिसची सुविधा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तीन ठिकाणी डायलेसिस सेंटर सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये कोपरी येथील शेठ लाखिमचंद फतीचंद प्रसूतिगृहामध्ये नोव्हेंबर २०१७ साली डायलेसिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मयत वाजीराने हे डायलेसिस करण्यासाठी येत होते. बुधवारी देखील ते डायलेसिस करण्यासाठी आल्यानंतर त्यांना आॅक्सिजन लावण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या म्हण्यानुसार आॅक्सिजन संपल्यानंतर त्यांना दुसरे आॅक्सिजन लावेपर्यंत वेळ लागला असल्याने त्यांचा मृत्य झाला. रु ग्णालयात रु ग्णवाहिका देखील उपलब्ध नसल्याने हॉस्पिटलच्या खाली जवळपास अर्धा तास त्यांना ठेवल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. हा प्रकार झाल्यानंतर स्थानिक नागरसेविका मालती पाटील यांनी रु ग्णालयात येऊन या सर्व घटनेचा जाब विचारला. यादरम्यान रु ग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला देखील डॉक्टर तसेच इतर कर्मचाºयांना सामोरे जावे लागले. या ठिकाणी सिनियर डॉक्टर देखील देखील १० दिवसांपासून रजेवर असून रु ग्णवाहिकेची आणि स्ट्रेचरची देखील या ठिकाणी सुविधा नसल्याची कबुली सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी दिली.
या संदर्भात ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, हा रु ग्ण रक्तदाबाचा पेशंट असल्याचे त्यांनी सांगितले. डायलेसिस झाल्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तब्येत आणखी खालावल्यामुळे त्यांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगण्यात आले. दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नकार दिल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही असे केंद्रे यांनी स्पष्ट केले.