महापालिकेच्या सेवेतून ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त; पालिकेत पोकळी वाढली
By अजित मांडके | Published: June 28, 2024 03:37 PM2024-06-28T15:37:59+5:302024-06-28T15:38:25+5:30
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते.
ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या वाढतांनाच दिसत आहे. मे महिन्यात ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा ६२ अधिकारी, कर्मचाºयांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका दिवसेंदिवस रिती होत असल्याचेच चित्र या निमित्ताने दिसत आहे. यात उपायुक्त, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्याध्यापिका, लिपीक, प्राथमिक शाळेचे शिक्षक आदींचा यात समावेश आहे. महापालिका शाळांमध्ये आधीच मुख्याध्यापकांची कमतरता आहे. शिक्षकांची देखील वानवा भासत आहे. त्यात सेवा निवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही.
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता जून महिन्यात तब्बल ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. दर महिना कर्मचाºयांची ही संख्या वाढतच जात आहे. त्यात आता शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. मागील महिन्यात देखील एक कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले होते. त्यात पुन्हा एकाची भर पडली आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त, वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, कार्यालयीन उपअधिक्षक, दोन मुख्याध्यापिका सिस्टर इनचार्ज, वरीष्ठ लिपिक, दोन लिपीक, वरीष्ठ लेखापरिक्षक, प्रस्ताविका, प्राथमिक शिक्षका ११, चालक यंत्रचालक, वाहन चालक, जमादार, आरक्षक, बालवाडी आया, माळी बिगारी, बिगारी, सफाई कामगार आदींचा त्यात समावेश आहे.
मागील काही वर्षापासून महापालिका शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्या कमी आहे. महापालिकेने तासिका शिक्षक घेतले असले तरी देखील ते पूर्ण क्षमतेने हजर होत नसल्याने शिक्षकांची पोकळी दिसून येत आहे. त्यातही मुख्याध्यापकांची संख्या देखील आता घटत चालली आहे. दुसरीकडे शिक्षक नसल्याने मुख्याध्यापकांना देखील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही पोकळी केव्हा भरुन निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.