६२ हजारांचे वीजबिल अखेर २०३ रुपये
By admin | Published: June 25, 2017 03:59 AM2017-06-25T03:59:38+5:302017-06-25T03:59:38+5:30
‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी इंदिरानगर झोपडपट्टीतील राजू शिर्के यांना ‘महावितरण’ने ६२ हजार रुपयांचे बील पाठवल्याबद्दल जाब विचारण्यात आला. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेत चौकशी केली. अखेर हे बील २०३ रुपये केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली.
वाढीव बिलांप्रश्नी घेराव घातल्यानंतर शिर्के यांचे बील काही तासांतच ६२ हजारांवरून थेट २०३ इतके कमी करण्यात आले. हे कसे शक्य झाले, असा सवाल कांबळे यांनी केला. भाजपाच्या आंदोलनामुळे शिर्के यांना दिलासा मिळाला असला तरी असा सावळा गोंधळ किती जणांच्या बाबतीत असेल? ‘महावितरण’च्या हलगर्जीमुळे अनेकांना सदोष बिले जात असतील. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच होत असेल. किती वेळा आंदोलन करायची आणि का? त्यातून काही निष्पन्न होणार आहे की नाही. सातत्याने अशा चुका का केल्या जातात? की त्या जाणुनबुजून केल्या जातात, असे सवालही त्यांनी विचारले.
वाढीव बिले आलेल्या वीजग्राहकांनी ठिकठिकाणी भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटावे, असे आवाहन कांबळे यांनी केले. जिल्ह्यातील भाजपाच्या नगरसेवकांनी नागरिकांना सहकार्य करावे, ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. ज्यांना न्याय मिळेल त्यांना मिळेल. भाजपा नागरिकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.