ठाणे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ६२४ कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:44+5:302021-04-02T04:42:44+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६२४ कोटी ७८ लाख इतका महसूल जमा केला आहे. ...
ठाणे : ठाणे महापालिकेने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६२४ कोटी ७८ लाख इतका महसूल जमा केला आहे. गतवर्षी ५०२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत १२२ कोटी ७८ लाख इतका अतिरिक्त मालमत्ताकर जमा झाला. तब्बल चार हजार ३१२ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी दंडाच्या रकमेत सवलत दिली होती. नागरिकांनी आपला कर भरणा करून महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी करदात्यांचे आभार व्यक्त केले.
मालमत्ता करासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ६८३ कोटी इतके उद्दिष्ट निश्चित केले होते. मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले होतेे. यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. या बाबीचा विचार करून महापालिकेने नागरिकांकडून कराच्या थकबाकीपोटी आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ केली. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर म्हस्के आणि आयुक्त डॉ. शर्मा यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. सुट्टीच्या दिवशी आणि ऑनलाइन करभरणा सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या करवसुलीचे उद्दिष्ट जवळपास साध्य करण्यात यशस्वी ठरल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे एप्रिल ते जुलै २०२० अखेरपर्यंत कोविडचा कालावधी वगळता केवळ २४५ दिवसांच्या कालावधीमध्ये मालमत्ता कराची देयके तयार करणे, वितरित करणे, वसुलीसाठी पाठपुरावा करणे आदी कामकाज मालमत्ताकर कार्यालयाकडील अधिकारी/ कर्मचारी यांनी पार पाडले.
जे करदाते थकीत रकमेसह चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या करासह दुसऱ्या सहामाहीची रक्कम जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कराच्या देयकातील सामान्य करामध्ये सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या सवलत योजनेस करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख ८० हजार इतक्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या कालावधीमध्ये २४१ कोटी ५२ लाख इतका मालमत्ताकर जमा झाला.
* जे निवासी करदाते १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ताकर, चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सवलत योजना राबविण्यात आली. या सवलतीचा एक लाख १३ हजार ५२८ इतक्या करदात्यांनी लाभ घेतला. १३ कोटी ८६ लाख इतक्या रकमेची सूट देण्यात आली.
..........................
वाचली