बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:41 AM2019-07-23T01:41:28+5:302019-07-23T01:41:42+5:30
गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के
सुरेश लोखंडे
ठाणे : पाणलोट क्षेत्रातह पाऊस कमी झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठा वाढण्यास यंदा विलंब झाला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. पण, यंदा मात्र केवळ ६३ टक्के साठा तयार झाला आहे. मात्र, या वर्षी बारवीचा पाणीसाठा चार मीटरने वाढणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दरवाजेही बंद करावे लागणार आहेत. याच्या जय्यत तयारीस अनुसरून पाणलोट क्षेत्रातील गावपाड्यांच्या स्थलांतरासह निवास व्यवस्थेचीदेखील काळजी घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
जिल्ह्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात नेहमी ६८.६० मीटर पाणी साठा केला जात आहे. परंतु, यंदापासून या धरणात चार मीटरने वाढीव म्हणजे ७२.६० मीटर पाणीसाठा होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०१.३८ टक्के पाणीसाठा तयार होता. यंदा केवळ जुन्या क्षमतेनुसार ६३.३६ टक्के साठा तयार झाला असून वाढीव पाणीसाठ्यास अनुसरून बारवीत आतापर्यंत ४३.५८ टक्के पाणी साठवण्यात आले आहे.
घरभाड्यासह उदरनिर्वाह भत्त्याचेही वाटप
धरणात पाणीसाठा वाढणार असल्यामुळे या रहिवाशांच्या निवास व्यवस्थेची समस्या उद्भवणार आहे. यावर उपाययोजना म्हणून या गावकऱ्यांना सहा हजार रूपये प्रती महिना घरभाडे मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर ११ महिन्याचे ६६ हजार रूपये घर भाडे आगाऊ देऊन उदरनिर्वाहसाठी प्रत्येक कुटुंबाला ७१ हजार ५०० रूपये भत्ता दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रहिवाशांच्या घरासाठी भूखंडही मंजूर झाले आहेत. पाच कुटूंब संख्या असलेल्यांसाठी ३७० मीटर तर पाच पेक्षा जास्त असलेल्यांसाठी ७४० मीटर भूखंड मंजूर होता. पण या रहिवाश्यांच्या मागणीस अनुसरून या घराच्या भूखंडा ऐवजी पाच जणांच्या कुटुंबाच्या घरासाठी सहा लाख ६५ हजार तर पाच पेक्षा जास्त जणांच्या घरासाठी १३ लाख ३० हजार रूपये वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कातकोलीच्या पाड्यांच्या पुनर्वसनात अडसर
वाढीव पाणीसाठ्यासाठी जल समाधी मिळणाºया सात गावपाड्यांचे पुनर्वसन केले जात आहे. यात शंभर टक्के बुडणाºया तोडली गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मिटला आहे. गावठाण विकसित करून पुनर्वसन झाले आहे. याशिवाय कातकोलीच्या मुरगवाडी, गुरूवाडी, देवपाडा आण जांभूळवाडी चार चार पाड्यांच्या नागरिकांना पैसे वाटप होऊन त्यांच्या निवास व्यवस्थेचीदेखील व्यवस्था पूर्ण झाल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु, कातकोलीच्या या चार पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या प्लॉट अलॉटमेंटसाठी मात्र विलंब झालेला आहे. सुमारे ३३० कुटूंब असलेल्या या पाड्यांची अंदाजे एक हजार ५०० लोकसंख्या आहे.