अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन साजरा
By पंकज पाटील | Published: May 11, 2023 04:42 PM2023-05-11T16:42:25+5:302023-05-11T16:43:26+5:30
अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले.
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेचा 64 वा वर्धापन दिन पालिका कार्यालयात साजरा करण्यात आला ासाठी नव्या प्रशासकीय इमारतीची सजावट करण्यात आली होती तसेच सर्व राजकीय पक्षाच्या पुढार्यांना आणि लोकप्रतिनिधींना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. 1970 ते 76 हा कार्यकाल अंबरनाथ शहराच्या गतिमान विकासाला चालना देणारी ठरला होती, मात्र त्याच कालावधीनंतर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अंबरनाथ नगरपालिका 1978 मध्ये बरखास्त करण्यात आली. ज्या कार्यकालात अंबरनाथ शहराचा सुवर्णकाळ सुरू होता त्याच कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अंबरनाथ नगर पालिकेचे अस्तित्वच धोक्यात आले. कालांतराने अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण डोंबिवली महापालिकेत करण्यात आला आणि त्याच कालावधीत अंबरनाथ शहराला उतरती कळा लागली. अंबरनाथ शहराला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी एक स्वतंत्र लढा सुरू झाला आणि या लढ्यात सहभागी झालेल्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र अशा परिस्थितीही हा लढा सुरूच ठेवत 14 एप्रिल 1992 मध्ये अंबरनाथ नगरपालिका स्वतंत्र करून घेण्यात आली.
1995 मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील पार पडल्या. नगरपालिका म्हणून शहराचे स्थित्यंतर सुरू असले तरी ज्या नगरपालिकेची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली होती तो स्थापना दिवस आजही पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी अखंडितपणे साजरा करीत आहेत. आज पालिकेचे कामकाज नव्या प्रशासकीय इमारतीत गेल्याने या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेचा वर्धापन दिन देखील उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि लोकप्रतिनिधींना पालिका कार्यालयात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील विकास कामांची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली. यानंतर स्वतः मुख्याधिकारी रसाळ यांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाची माहिती आणि सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली. यावेळी माजी गुलाबराव करंजुले पाटील, सुनील चौधरी, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, रिपाई सेक्युलरचे अध्यक्ष शाम गायकवाड, अब्दुल शेख, प्रदीप पाटील, सदाशिव पाटील त्यांच्यासह पालिकेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.