पीएफ कार्यालयाची ६.५० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:26 AM2018-03-01T02:26:03+5:302018-03-01T02:26:03+5:30
कामगारांचे पैसे त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून भलत्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करणा-या भिवंडीच्या माजी नगरसेविका दीपाली भोई यांच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : कामगारांचे पैसे त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून भलत्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करणा-या भिवंडीच्या माजी नगरसेविका दीपाली भोई यांच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ३० ते ३५ कामगारांची सहा लाख ४७ हजार ५५२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुरबाड एमआयडीसीतील विद्यावासिनी स्टील प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेड आणि पालघरच्या वाडा तालुक्यातील कुडूस येथील मेसर्स कुडूस स्टील रोलिंग मिल्स प्रायव्हेट या दोन कंपन्यांमधील मूळ भविष्य निर्वाह निधी सदस्यांची ठाण्याच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा झालेली सहा लाख ४७ हजार ५५२ इतकी रक्कम प्राधिकृत अधिकारी आणि इतर बँक खातेधारक यांनी आपसात संगनमत करून ती अन्य बँक खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. प्राधिकृत अधिकारी फिरोज सिद्दीकी (रा. राबोडी, ठाणे), भिवंडी-निजामपुरा महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका भोई आणि स्टील रोलिंग मिल्स कंपनीचे गंगाराम अग्रवाल यांना या कामगारांची बँक खाती तसेच इतर माहिती होती. त्यांच्याच माहितीने हे पैसे वळते झाले असल्यामुळे प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. २००९ ते २०१६ या काळात सुमारे साडेसहा लाखांची रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात वळती झाली आहे.
तपास करणार-
ठाण्याच्या पीएफ विभागाचे अधिकारी मोहंमद खान यांनी २७ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकाचे पैसे दुसºयाच्या खात्यावर कशामुळे जमा झाले, याचा तपास करू असे पो.नि. अनघा देशपांडे यांनी सांगितले.