विकासकांच्या प्रकल्पाना स्टेमकडून ६५ एमएलडी पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 10:50 PM2020-12-21T22:50:25+5:302020-12-21T22:50:31+5:30
वादग्रस्त प्रस्ताव रद्द करण्याचा महापौर नरेश म्हस्के यांचा महत्वपूर्ण निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्टेम कंपनी उभारण्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या ठाणे महापालिकेला केवळ १० एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यासाठी हात आखडता घेणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून विकासकांच्या प्रकल्पना मात्र ६५ एमएलडी पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी ठाणे महापालिकेत झालेल्या स्टेमच्या बैठकीत उघड झाली आहे. एकीकडे महापालिकांची तहान भागत नसताना विकासकांना ६५ एमएलडी पाणी देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी कशी देण्यात आली ? असा मुद्दा उपस्थित करत महापौर तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी हे सर्व वादग्रस्त प्रस्तावच रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेतला आहे. महापौरांच्या या निर्णयामुळे स्टेमच्या कारभाराला लगाम लागला आहे.
ठाणे महापालिकेला १० एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. प्रशासनाची ही मागणी आतापर्यंत स्टेमकडून गांभीर्याने घेण्यात आलेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वीच महापौर नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांची एक बैठक लावून या बैठकीत स्टेमच्या संपूर्ण कारभाराचीच चिरफाड केली होती. यावेळी १० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी पुन्हा एकदा महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्टेमच्या बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीला स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच ठाणे, भिवंडी, मिराभाईंदर या महापालिकांचे आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीच्या दरम्यान अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच एकीकडे ठाणे महापालिका वाढीव पाणी मागत असताना दुसरीकडे विकासकांच्या प्रकल्पना मात्र गव्हर्निंग कौन्सिलची मान्यता न घेता तब्बल ६५ एमएलडी पाणी पुरवठा देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्टेम उभारण्यामध्ये मोठा वाटा हा ठाणे महापालिकेचा आहे मात्र महापालिकांनी तहान न भागवत विकासकांच्या पाणी देण्याचे प्रस्तावांना मंजुरी कशी दिले जाते यावर महापौरांनी स्टेमला चांगलेच धारेवर धरले. हे सर्व प्रस्ताव रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी बैठकीत घेतल्याने तब्बल ६५ एमएलडी पाणी आता महापालिकांना मिळण्याची चिन्हे आहेत.
टाटा आमंत्र आणि अंजूर येथील टाऊनशीपचे पाणी रोखण्याचा निर्णय ...
विविध विकासकांना पाणी देण्याच्या प्रस्तावाबरोबरच टाटा आमंत्रण आणि अंजूर येथील टाऊनशिपचा पाणी पुरवठा बंद करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे . स्टेमकडून टाटा आमंत्रला २ लाख लिटर तर अंजूर येथील टाऊनशीपला १ लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. स्टेम कडून असे अनेक वादग्रस्त प्रस्तावना मंजुरी देण्यात आली असल्याने या सर्वांवरच आक्षेप घेऊन पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.