ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65; तर 10 नगर परिषद, नगरपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 09:15 PM2017-12-13T21:15:27+5:302017-12-13T21:15:46+5:30
मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21च्या पोटनिवडणुकीसाठी 29 टक्के मतदान झाले असून इतर विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठी देखील शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी मतदान झाले; तसेच त्याअंतर्गतच्या शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठीही मतदान झाले. शेलार निवडणूक विभागातील मतदान केंद्र क्र. 38/6 वर फेरमतदान घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे शेलार निवडणूक विभाग; तसेच शेलार निर्वाचक गण आणि कोलीवली निर्वाचक गणाची मतमोजणी पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्तपदासोबतच चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 14) मतमोजणी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदान
विविध जिल्ह्यांमधील 6 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आणि अध्यक्षपदासाठी; तसेच पाच नगरपरिषदा व एका नगरपंचायतीतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले, असेही सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान असे: हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18, नंदुरबार- 70.93, नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34, किनवट (जि. नांदेड)- 77, चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85, पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56, वाडा (जि. पालघर)- 72.79, शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59, फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 आणि सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65. सरासरी- 72.81.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83, शहादा (जि. नंदुरबार)- 63.50, अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61, जिंतूर (जि. परभणी)- 64.42, मंगरूळपीर (जि. वाशीम)- 58.62 आणि एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37. वाडा नगरपंचायत व नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषदेची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे. अन्य सर्व ठिकाणीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी उद्या (ता. 14) होईल.
मुंबईत एका जागेसाठी मतदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 29 टक्के मतदान झाले. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे एकूण 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.