१९९ चेंडूंत ६५२ धावांचे तुफान!
By admin | Published: January 5, 2016 03:23 AM2016-01-05T03:23:55+5:302016-01-05T03:23:55+5:30
मैदानात चौकार-षटकारांची अक्षरश: आतशबाजी सुरू आहे... जल्लोष क्षणभरही थांबत नाही... बघता-बघता १९९ चेंडूंत नाबाद ६५२ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली जाते
कल्याण : मैदानात चौकार-षटकारांची अक्षरश: आतशबाजी सुरू आहे... जल्लोष क्षणभरही थांबत नाही... बघता-बघता १९९ चेंडूंत नाबाद ६५२ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली जाते... ख्रिसगेलसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कोणत्याही तडाखेबाज खेळाडूचे हे तुफान नसून, दहावीत शिकत असलेल्या कल्याणच्या १६वर्षीय प्रणव धनावडे नावाच्या वादळाने हा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कल्याणमधील वायलेनगर परिसरातील युनियन क्रि केट अॅकॅडमीच्या ग्राउंडवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरशालेय एच.टी. भंडारी क्रिकेट कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रणवच्या धुवाधार फलंदाजीने यापूर्वी १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स याने केलेल्या ६२८ धावांचा विक्रम मोडला गेला. रिझवी स्प्रिंगफील्डच्या पृथ्वी शॉ याने २०१४ साली मुंबईतील स्पर्धेत ५४६ धावांचा विक्रम केला होता. तो विक्रमही प्रणवने मागे टाकला. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत १०वीत शिकत असलेला प्रणव ५ तास मैदानावर तळ ठोकून होता. तो नाबाद असून, पहिल्या दिवसअखेर त्याच्या संघाने प्रणवसह आकाश सिंग (१७३) आणि सिद्धेश पाटील (नाबाद १००) यांच्या खेळीच्या जोरावर
१ बाद ९५६ धावांचा एव्हरेस्ट उभारला आहे.