CoronaVirus News : सोरगाव मातोश्री वृद्धाश्रमातील 66 जणांनी कोरोनावर केली मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:37 PM2021-12-06T21:37:16+5:302021-12-06T21:38:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मातोश्री वृध्दाश्रमात २७ नोव्हेंबरला झालेल्या अँटीजेन चाचणीत ६२ जण पॉझिटिव्ह आढळले होते.
ठाणे - मौजे सोरगाव, मातोश्री वृध्दाश्रमातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे आज जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, याच वृद्धाश्रमातील अन्य ६६ जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
मातोश्री वृध्दाश्रमात २७ नोव्हेंबरला झालेल्या अँटीजेन चाचणीत ६२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच अन्य पाच संशयित अशा ६७ रुग्णांवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे आज निधन झाले असून त्यांना सहव्याधी (कोमोर्बीड) असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. सध्या १२ रुग्णांवर उपचार असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक त्यांचे निकटसहवासित तसेच नातेवाईक, कर्मचारी यांची चाचणी करण्यात आली. २९ नोव्हेंबरला ५२ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आढळले. १ डिसेंबरला १८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात त्यात एक जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ८० झाली होती. त्यापैकी ७९ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ७५ रुग्ण सामान्य कक्षात तर ४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते त्यातील ६६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून आता सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.