गणेशोत्सवासाठी एकाच दिवसात ठाणे विभागातून एसटीच्या ६७७ बसेस कोकणाकडे मार्गस्थ
By जितेंद्र कालेकर | Published: September 8, 2021 11:27 PM2021-09-08T23:27:34+5:302021-09-08T23:55:48+5:30
गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. खोपट स्थानकातून एकाच दिवसात २७८ बसेस बुधवारी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने निर्बंध ही शिथिल आल्याने यंदा राज्य परिवहन महामंडळाने १० सप्टेंबर रोजी पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी जोरदार आखणी करीत तब्बल ९०३ बसेसचे नियोजन केले. राज्यातील जळगाव, नाशिक,अहमदनगर, पुणे यांच्यासह आठ डेपोंचे विशेष सहकार्य घेण्यात आले.
या आठ डेपोतून ५५० बसेस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तर ठाणे विभागाच्या २०० बसेसचा यात समावेश आहे. ठाण्याचे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव आणि वाहतूक अधिकारी आर. एच. बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली या बसेसचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोकणात जाण्यासाठी रविवारपासूनच चाकरमान्यांनी सुरुवात केली. मात्र, सोमवारी १२, मंगळवारी १२८ तर बुधवारी सर्वाधिक म्हणजे तब्बल ६७७ बसेस संपूर्ण ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. यात एकटया खोपट सेंट्रल बस स्थानकातून (सीबीएस) २७८ बसेस रवाना झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक भालेराव यांनी दिली. या सर्व बसेस सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात रवाना झाल्या आहेत.
* बुधवारी एकाच दिवसात भार्इंदरमधून ५, बोरीवली- १४९, ठाणे- २७८, कल्याण १६७ तर विठ्ठलवाडीतून ७७ बसेस कोकणाकडे रवाना झाल्या आहेत.
* खोपटमध्ये प्रवाशांची गर्दी-
कोकणात गण्ोशोत्सवाला जाण्यासाठी बुधवारी मोठया प्रमाणात गृप तसेच वैयक्तिक आरक्षण असल्याने सकाळ पासूनच बसेस पकडण्यासाठी ठाण्यातील खोपट स्थानकात मोठी गर्दी झाली होती. मात्र, एसटी विभागाच्या योग्य नियोजनामुळे तसेच प्रवाशांनीही सोशल डिस्टसिंगचे नियम पाळल्यामुळे गर्दीवर नियंत्रण आल्याची माहिती सूत्रांनी दिली.